चीनचे अजून एक कारस्थान उघड; भारतीय हद्दीत बांधले गाव  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षाच्या मे महिन्यापासून लडाखच्या सीमाभागात वाद उफाळलेला आहे. हा वाद अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. आणि अशातच आता अजून एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली -  भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षाच्या मे महिन्यापासून लडाखच्या सीमाभागात वाद उफाळलेला आहे. हा वाद अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. आणि अशातच आता अजून एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. अरुणाचलमध्ये चीनने अखंड एक गाव वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने भारतीय हद्दीतील अरुणाचल प्रदेश मध्ये जवळपास 101 घरे बांधली आहेत. भारताच्या प्रत्यक्ष सीमारेषेपासून तब्बल 4.5 किलोमीटर अंतराच्या आत हे गाव आहे. 

अरुणाचल प्रदेशमधील सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या काठावर चीनने हे गाव वसवले आहे. या भागावरून दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र युद्धाची जागा म्हणून मार्क केले आहे. हिमालयाच्या पूर्वेकडील रांगेत असलेले हे गाव दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या लडाख संघर्षाच्या काळातच वसवण्यात आले आहे. लडाख मधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांना भीडले होते. यामध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. तर चीनने मात्र त्यांचे किती जवान यात मारले गेले हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

अरुणाचल प्रदेश मधील मधील दोन फोटो समोर आले आहेत. यातील एक फोटो 26 ऑगस्ट 2019 चा तर दुसरा फोटो 1 नोव्हेंबर 2020 चा आहे. यात पहिल्या फोटोत काही बांधकाम झालेले दिसत नाही. मात्र मागील वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये काढण्यात आलेल्या फोटोत अनेक घरे दिसत आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चीनकडून भारताच्या सीमाभागात बांधकाम केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय चीनने मागील काही वर्षांमध्ये बांधकामाच्या हालचाली केल्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 

संबंधित बातम्या