दिल्लीतील प्रदूषणावरून जावडेकर-केजरीवाल आमने सामने

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

दिल्लीत हिवाळ्याआधीच जीवघेण्या प्रदूषणाची चाहूल लागली असली तरी दरवर्षी हिवाळ्यात नित्यनेमाने दिल्लीकरांचा श्‍वास कोंडणाऱ्या या प्रदूषणाचे नेमके कारण कोणते, यावरूनच जोरदार राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे.

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला शेजारच्या राज्यांत शेतातच जाळण्यात येणाऱ्या काडीकचऱ्याचे प्रमाण नगण्य म्हणजे फक्त 4 टक्के असते अशी भूमिका केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज घेतली. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘‘(काडीकचऱ्याच्या कारणाचा) वारंवार इन्कार केल्याने काही होणार नाही’’ असा उलटवार केला. दिल्लीत हिवाळ्याआधीच जीवघेण्या प्रदूषणाची चाहूल लागली असली तरी दरवर्षी हिवाळ्यात नित्यनेमाने दिल्लीकरांचा श्‍वास कोंडणाऱ्या या प्रदूषणाचे नेमके कारण कोणते, यावरूनच जोरदार राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे.

जावडेकर यांनी काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याबाबत पंजाब सरकारला कडक इशारा दिला. मात्र शेजारच्याच हरियाणातील याच बेशिस्तीबद्दल त्यांनी ‘ह’ देखील उच्चारल्याचे वृत्त नाही. नासाच्या ताज्या उपग्रह छायाचित्रांनुसार पंजाबातील अमृतसर, फिरोजपूर व फरीदकोट तसेच भाजपशासित हरियाणातील शेतात काडीकचरा प्रचंड प्रमाणात जाळला जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रदूषण वाढल्याने अनेक नागरिकांना डोळेजळजळणे, श्‍वास घेताना अडथळे असे त्रास होतात. 

बशीच्या आकारात वसलेल्या दिल्लीचे रूपांतर दर हिवाळ्यात "गॅस चेंबर'' मध्ये करणाऱ्या प्रदूषणात काडीकचऱ्याचे प्रमाण मोठे असल्याचे केंद्र सरकारने एकदा नव्हे अनेकदा मान्य केले आहे. 

खुद्द जावडेकर यांनी यापूर्वी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून बोलताना, ‘‘शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या धुरावर आधी नियंत्रण आणा’’ अशी भूमिका घेतली होती. 

संबंधित बातम्या