पिझ्झाची होम डिलिव्हरी होऊ शकते तर रेशनची का नाही? अरविंद केजरीवाल यांचा प्रश्न

दैनिक गोमंतक
रविवार, 6 जून 2021

सर्व तयारी पूर्ण झाली होती मात्र आपण ही योजना थांबवली असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाचा विरोध केला.  

दिल्ली सरकारच्या (Delhi Government) रेशनच्या डोअर स्टेप डिलिव्हरी (Door Step Delivery of Ration) योजनेला केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये (Central Government) मोठ्या प्रमाणात खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याविषयी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "पंतप्रधानजी आपण अत्यंत व्यथित झालो असून, तुमच्याशी बोलू इच्छितो आहे. जर माझाकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा"  असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी या विषयाला पुन्हा चर्चेत आणले आहे. (Arvind Kejriwal criticizes Narendra Modi on the issue of door step delivery of ration)

दिल्लीत पुढील आठवड्यापासून रेशन घरी पोहोचवण्याच्या योजनेला सुरुवात होणार होती, त्यामुळे कुणालाही रेशन मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागले नसते तर रेशन थेट त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले असते. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती मात्र आपण ही योजना थांबवली असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाचा विरोध केला.  

हेमा मालिनींनी दिला कोरोना महामारी संपेपर्यंत रोज होम हवन करण्याचा सल्ला

केजरीवाल म्हणाले की "ही या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्याने आम्हाला केंद्र सरकारच्या मान्यतेची गरज नाही, राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करण्यास सक्षम आहे. मात्र आम्हाला केंद्र सरकारशी संघर्ष नको होता म्हणून आम्ही 5 वेळा मंजुरी घेतली. मार्च महिन्यात केंद्र सरकारने काही आक्षेप घेतले, आम्ही ते सर्व आक्षेप दूर केले. आपण म्हणाले की या योजनेचे नाव मुख्यमंत्र्यांच्या नावावर होऊ शकत नाही, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचे नाव काढून टाकले. आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही मान्य केल्या आणि त्यानंतरही आपण म्हणता की आम्ही आपली मंजुरी घेतली नाही. मला सांगा, मंजुरी कशी मिळाली? एवढे करूनही आपण ही योजना का नाकारली?"

जर पिझ्झा, बर्गर, स्मार्टफोन आणि कपड्यांची होम डिलीव्हरी या देशात केली जाऊ शकते तर मग गरिबांच्या घरात घरपोच रेशनची डिलिव्हरी का होऊ नये? संपूर्ण देश हे जाणून घेऊ इच्छितो की, आपण ही योजना का नाकारली? ही योजना कशी नाकारली जाऊ शकते? आपण जर रेशन माफियांच्या पाठीशी उभे राहिले तर देशातील गरीबांचे काय होईल?  20 लाख गरीब कुटुंब कोण ऐकणार? असे प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. 

संबंधित बातम्या