पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराने पुन्हा डोके वर काढले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काल तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला आहे.

कोलकता :   पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराने पुन्हा डोके वर काढले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काल तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला आहे. नड्डांवरील या हल्ल्याची केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे. 

राज्यपाल जगदीप धनकर यांनीही या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या दगडफेकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्या मोटारीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.नड्डा यांच्या वाहनाचा ताफा कोलकत्याहून दक्षिण २४-परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बरच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी नड्डा यांच्यासोबत काही प्रसिद्धी माध्यमांची देखील वाहने होती, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक केली, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

विजयवर्गीय, रॉय जखमी

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्या कारवर देखील हल्लेखोरांनी दगडफेक केली, यामध्ये त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. हल्लेखोरांनी फेकलेला एक दगड थेट विजयवर्गीय यांना लागल्याने ते जखमी झाले. या दगडफेकीमध्ये मुकुल रॉय देखील जखमी झाल्याचे समजते.

ममतांची केंद्रावर टीका

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्याच्या घटनेवरून केंद्रावरच निशाणा साधला आहे. भाजप केंद्रीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलांवर विसंबून असतो. कायदा सुव्यवस्थेबाबत संघराज्य व्यवस्थेला नाकारले जाते. मोठे नेते राज्यांच्या दौऱ्यावर आल्यानंतर राज्य पोलिसांकडे दुर्लक्ष करून केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना झुकते माप कसे काय दिले जाऊ शकते, असा सवाल बॅनर्जी यांनी केला.

संबंधित बातम्या