केंद्र सरकारकडून शेतकरी आंदोलकांची बदनामी: किसान मोर्चाचा गंभीर आरोप

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

गंभीर आरोपींचे फलक शेतकऱ्यांमध्ये घुसवून आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. 

नवी दिल्ली: आंदोलक शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे बिथरलेल्या केंद्र सरकारने भाजपशासित राज्यांतून नकली शेतकरी आणून तसेच गंभीर आरोपींचे फलक शेतकऱ्यांमध्ये घुसवून आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. 

संयुक्त किसान सभेचे समन्वयक संदीप गिड्डे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘सारे मार्ग वापरूनही शेतकरी नेत्यांची एकजूट कायम असल्याचे पाहून सरकार बिथरले आहे. सरकारबरोबर चर्चेच्या सहा  फेऱ्या पार पडल्या असून तिसऱ्या फेरीपासून कायद्यांमध्ये त्रुटी असल्याचे सरकारच मान्य करू लागले आहे. गंभीर त्रुटी आहेत त्या अर्थी ते कायदे रद्द करून देशातील कृषी अभ्यासक व शेतकरी यांच्याशी चर्चा करून नवा कायदा तयार करावा, अशी संयुक्त किसान मोर्चाची भूमिका आहे. भारत बंदचा प्रतिसाद पाहता या आंदोलनाची दखल घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनीही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र शिष्टमंडळाने ती फेटाळली.’’

 आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपकडून काही नकली शेतकऱ्यांना चिल्ला बॉर्डर येथे बसविले. तथाकथित नेते भानुप्रताप यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह व कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्यासोबत हातमिळवणी करून चिल्ला बॉर्डर येथील आंदोलन मागे घेऊन गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी सदर शेतकरी नेते व संयुक्त किसान मोर्चाचा काही संबंध नाही. गाझीपूर बॉर्डर येथे आंदोलन कायम असून हजारो शेतकरी रोज तेथे येत आहेत. 

आणखी वाचा:

गोवा आपचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी पक्षावरील विश्वास परत केल्याबद्दल गोव्यातील जनतेचे मानले आभार -

 

आंदोलनाची धार कमी होत नाही असे पाहून सत्ताधारी मंडळींनी आंदोलन बदनाम करण्याकरिता काही असामाजिक घटकांना घुसवून टिकरी बॉर्डर येथे उमर खालिद, इमाम शेरगिल यांच्यासारख्या गंभीर आरोप असणाऱ्या आरोपींच्या समर्थनाचे फलक प्रदर्शित केले.
-संदीप गिड्डे पाटील, शेतकरी नेते

संबंधित बातम्या