राजस्थानमध्ये ऑडिओ बॉम्ब फुटला

Avit Bagle
शनिवार, 18 जुलै 2020

आमदारांच्या खरेदीसाठी ‘अर्थ’पूर्ण व्यवहार
भाजप नेते शेखावत, शर्मा आणि जैन अडचणीत

जयपूर

राजस्थानमध्ये आमदारांच्या घोडेबाजारासंबंधीची ऑडिओ क्लिप उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या क्लिपनंतर भाजपमधील दिग्गज नेते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यातील विशेष कृती समूहाने (एसओजी) केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, काँग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. जैन यांना याप्रकरणी अटक झाल्याचेही समजते. काँग्रेसचे नेते महेश जोशी यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पायलट यांचे आमदार ज्या मानेसर आणि गुडगावमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी कृती समूहाची पथके रवाना झाली आहेत. आता पायलट समर्थक आमदारांची देखील चौकशी होऊ शकते. संबंधित ऑडिओ क्लिपच सत्यता पडताळण्यासाठी आमदारांच्या आवाजांचे नमुने देखील घेतले जाऊ शकतात. या ऑडिओ क्लिपनंतर भाजप नेत्या वसुंधराराजे गप्प असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. अशा स्थितीमध्ये राजेंनी भाजप नेत्यांचे समर्थन करायला हवे होते पण त्यांनी यावर मौन धारण केल्याने त्यांचा आशीर्वाद गेहलोत गटाला असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी मात्र त्या ऑडिओ टेपमध्ये आपला आवाज नसल्याने आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय बनावट क्लिपच्या माध्यमातून जाणीवपूर्वक आमची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असून यामध्ये विनाकारण केंद्रीय मंत्र्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदारांसाठी बोली
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज हॉटेल फेअरमाँटमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासारा देखील उपस्थित होते. भाजप आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी २५ ते ३५ लाखांची बोली लावली लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी कथित ऑडिओ क्लिपचा हवाला दिला. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत काँग्रेसने आमदार भंवरलाल आणि माजी मंत्री विश्‍वेंद्रसिंह यांचे पक्षसदस्यत्व रद्द केले. या दोघांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

त्या संभाषणात काय?
गुरूवारी रात्री व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तीचे संभाषण आहे. यातील एक व्यक्ती स्वत:ला संजय जैन तर दुसरा गजेंद्रसिंह असे संबोधून चर्चा करत आहेत. या चर्चेत भंवरलाल शर्मा यांच्या नावाचाही उल्लेख होतो. चर्चेच्या ओघामध्ये दोघांमध्ये आमदारांच्या खरेदीसाठीच्या आर्थिक देवाणघेवाणीचाही उल्लेख होतो. ही ऑडिओ क्लिप उघड झाल्यानंतर राजस्थानच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

यांच्यावर कारवाईची मागणी
गजेंद्रसिंह शेखावत, भंवरलाल शर्मा, संजय जैन, माजीमंत्री विश्‍वेंद्र सिंह

पायलट यांचे चिदंबरम यांच्याशी हितगूज
राजस्थानातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याचे समजते. चिदंबरम यांनीही आपण पायलट यांच्याशी चर्चा केल्याच्या बाबीला दुजोरा दिला आहे. ‘‘ पक्षाचे नेतृत्व पायलट यांच्याशी खुलेपणाने चर्चा करायला तयार आहे, सगळ्या गोष्टींवर बैठकीत चर्चा केली जाऊ शकते. ही संधी पायलट यांनी स्वीकारावी,’’ असा सल्ला मी त्यांना दिल्याचे चिदंबरम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. चिदंबरम यांच्याप्रमाणेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील पायलट यांच्याशी संवाद साधल्याचे समजते. प्रत्यक्ष न्यायालयामध्ये पायलट यांच्याविरोधात खटला लढवीत असले तरीसुद्धा विधीज्ञ आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनीही पायलट यांना चार हिताच्या गोष्टी सांगितल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या