अवघी झगमगली अयोध्यानगरी !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

सर्वत्र रोषणाई, जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण

अयोध्या

अयोध्येत इतिहास घडत असताना अलौकीक क्षणाचा साक्षीदार बनलेले हे प्राचीन शहर सध्या उत्सवाच्या रंगात रंगले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शहरभर दिवाळीसारखे असलेले वातावरण कार्यक्रम संपला तरी कायम होते.
भूमिपूजन कार्यक्रमासाठी हनुमान गढीपासून ते मंदिरस्थळापर्यंतचा रस्ता झेंडूच्या फुलांनी दुतर्फा सजविण्यात आला होता. सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेडनाही फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. या मार्गावरील दुकानेही पिवळ्या रंगात रंगविण्यात आली होती. हनुमान गढीलाही रंगरंगोटी करून सजविण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून अयोध्या रंगांमध्ये न्हाऊन गेली आहे. शहरभर सर्वत्र लाइटच्या माळांचा झगमगाट, शरयू नदीच्या घाटावर पणत्या, लोकांमध्ये सळसळता उत्साह यामुळे अयोध्यानगरीचे रुपच पालटून गेले आहे. ‘राम की पौडी’ येथे प्रशासनाने लावलेल्या सव्वा लाख दिव्यांमुळे सर्वत्र दिवाळीचाच भास होत होता. गेल्या वर्षीही येथे दिवाळीच्या आदल्या दिवशी झालेल्या दीपोत्सवात साडे चार लाख पणत्या लावल्या होत्या आणि तो विश्‍वविक्रम झाला होता. गेल्या काही दिवसांपासून शरयू तीरावरील ‘राम की पौडी’ लेझर लाइटच्या प्रकाशात झगमगत असून अयोध्यावासियांसाठी हा वेगळाच अनुभव आहे.
कार्यक्रमासाठी अयोध्येचा कानाकोपरा प्रशासनाने स्वच्छ केला आहे. ही स्वच्छता यापुढेही कायम राखली जाईल आणि हा कार्यक्रम त्यासाठी प्रेरणा ठरेल, अशी आशा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

तणावमुक्तीचा आनंद
अयोध्येत सर्वत्र उत्साही वातावरण असले तरी येथील वातावरणात गेले अनेक वर्षे असलेला तणाव आता दूर झाल्याने लोकांची मने हलकी झाली आहे. त्यामुळेच उत्साह द्वीगुणित झाला आहे. यंदा अनेक वर्षांनंतर प्रथमच मोठा कार्यक्रम असला तरी संचारबंदी लागू नसल्याचे पाहून लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अन्यथा, गेली अनेक वर्षे मोठ्या कार्यक्रमावेळी स्थानिक लोकांच्या मनात भितीचे वातावरण असायचे, संचारबंदी लागू व्हायची आणि दुकानदार दुकाने बंद करायचे. यंदा मात्र प्रथमच सर्व जण मुक्ततेचा आनंद घेताना दिसले. अनेक वर्षांनंतर मिळणाऱ्या या आनंदाचा आस्वाद घेताना काही वेळा कोरोनाचेही भान रहात नव्हते.

साकेत कॉलेजवर हेलिकॉप्टर उतरले
अयोध्येत ठरल्या वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर साकेत महाविद्यालयात तयार केलेल्या हेलिपॅडवर उतरले. या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी कोरोना संसर्गाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन केले. त्यांनी मास्क घातला होता. त्यांचे स्वागत करणाऱ्यांना दोन मीटर अंतरावर तयार केलेल्या पांढऱ्या वर्तुळात उभे केले होते.यानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पांढऱ्या वर्तुळात उभे होते.

हनुमानगढीचे दर्शन
कडक बंदोबस्तात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थितांना अभिवादन करत हनुमानगढीकडे रवाना झाला. रस्ते बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. परंतु गच्चीवर उभ्या असलेल्या नागरिकांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. हनुमान गढी येथे त्यांनी दहा मिनिटे पूजा केली. त्यानंतर १२ वाजता रामजन्मभूमि परिसरात पोचले. तेथे रामलल्ला विराजमानचे दर्शन आणि पूजा केली. यादरम्यान त्यांनी पारिजातक रोपट्याचे रोपण केले.

पारंपारिक पोशाख पेहराव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पारंपारिक पोशाख घातला होता. फिकट पिवळ्या रंगाचा कुर्ता, पांढरे धोतर आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतले होते. पंतप्रधानासमवेत राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

२००० ठिकाणांवरील माती, शंभर नद्यांचे पाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामलल्ला येथे पोचताच पूजा सुरू झाली. या वेळी २००० ठिकाणांहून आणलेली माती आणि शंभराहून अधिक नद्यांचे पाणी पूजेच्या ठिकाणी ठेवण्यात आले. १९८९ रोजी जगभरातून २ लाख ७५ हजार वीट रामजन्मभूमिसाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९ विटा भूमिपूजनाच्या वेळी मांडण्यात आल्या. पूजनानंतर मोदी यांनी संकल्प सोडला.

४८ मिनिटे पूजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधिवत पूजा केली. यादरम्यान त्यांनी चांदीच्या चार शिलांचे पूजन केले. दुपारी १२ वाजता भूमिपूजन सुरू झाली. ही पूजा ४८ मिनिटे चालली. अभिजित मुर्हूतावर भूमिपूजन आणि शिला पूजन झाल्यानंतर मोदी यांनी साक्षात दंडवत घातले. पंतप्रधानांनी देशाचा विकास आणि कोरोना संसर्गाचा नायनाट यासाठी श्रीरामाकडे आशिर्वाद मागितले. भूमिपूजनानंतर हर हर महादेव, जय श्रीराम आणि भारत माता की जय अशा घोषणा केल्या.

भेटवस्तू मोटारीतच विसरले
रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर मोदी भूमिपूजन स्थळी पोचले तेव्हा त्यांना एक गोष्ट मोटारीतच विसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे आसनस्थ होण्यापूर्वी ते आपल्या गाडीकडे गेले आणि काही सेंकदातच ते पूजेच्या ठिकाणी परतले. त्यांच्या हात चांदीचा कलश होता. तो पूजेदरम्यान तो कलश त्यांनी ताटात ठेवला होता. त्यानंतर ट्रस्टचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देव जी यांना तो कलश दिला. स्वामींनी तो कलश पूजेसाठी तयार केलेल्या खड्ड्यात ठेवला.

१७५ पाहुण्यांना चांदीचे नाणे
कोरोना संसर्गामुळे भूमिपूजन कार्यक्रमासाठी केवळ १७५ पाहुण्यांना निमंत्रण दिले होते. यात देशातील एकूण ३६ अध्यात्म परंपरेतील १३५ संतांचा समावेश होता. उर्वरित कारसेवकांच्या कुटुंबातील आणि अन्य नागरिकांना निमंत्रण दिले होते. भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना श्रीराम दरबाराचे चिन्ह असलेले चांदीचे नाणे देण्यात आले. हे नाणे मंदिर ट्रस्टने तयार केले आहे.

अडवानी, जोशींचा व्हीसीद्वारे सहभाग
राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी हे भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने सहभागी झाले. गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते अयोध्येत येऊ शकले नाहीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी देखील कोरोनामुळे कार्यक्रम रद्द केला. योग गुरू रामदेव बाब, रामभद्राचार्य, जुना आखाडाचे महामंडलेश्‍वर अवधेशानंद गिरी महाराज, मथुरा येथील राजेंद्र देवाचार्य, कांची मठचे गोविंद देव गिरी महाराज, रेवसा डांडिया येथील राघवाचार्य, चिदानंद मुनी, सुधीर दहिया, उपस्थित होते.

४०० क्विंटल फुलांनी शहर सजले
अयोध्यानगरी ४०० क्विंटल फुलांनी सजवण्यात आली होती. थायलंडहून आर्किड तर बंगळूरहून अपराजितेचे फुल मागवण्यात आले होते. त्याचवेळी झेंडूची फुले कोलकत्याहून आणली होती. भूमिपूजन स्थळ आणि परिसर फुलांनी सजवण्यात आला होता. याशिवाय साकेत पीजी कॉलेज ते नवीन घाटापर्यंतच्या ५० हून अधिक ठिकाणांवर रांगोळी काढली होती. त्यात फुलांचा वापर केला होता.

अयोध्येत स्नायपर तैनात
अयोध्या शहरात स्नायपर्स तैनात केले होते. अयोध्येला मोठ्या प्रमाणात सुरक्षा कवच देण्यात आले होते. त्यात ३५०० पोलिस कर्मचारी, पीएसीच्या ४० तुकड्या, सीआरपीएफच्या १० तुकड्या तैनात केल्या होत्या. दोन दिवस अगोदरपासूनच नाकाबंदी करण्यात आली होती.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या