बेळगावात दिवसात ११ पॉझिटीव्ह

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

शुक्रवारच्या 11 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 85 झाली आहे. त्यामधील 36 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात 48 जण उपचार घेत आहेत.

बेळगाव

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 8) एकाच दिवशी 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 10 जण हिरेबागेवाडीतील असून एकजण कुडचीचा आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 85 वर पोचली आहे. दिवभरात एकालाही डिस्चार्ज देण्यात आला नाही.
रविवार ते गुरुवार या पाच दिवसात केवळ हिरेबागेवाडीतील एका 13 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. मात्र, शुक्रवारी तब्बल 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात पाच महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यामधील दहा जण कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या हिरेबागेवाडीतील आहेत. त्यांचे वय 58, 30, 20, 16, 21, 45, 26, 38, 20, 23 असे आहे. तर कुडचीतील एका 20 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. सर्वजण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात होते. त्यामुळे, त्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या घशातील द्राव घेऊन प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यानुसार या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या सर्वांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात हलविण्यात आले आहे.
शुक्रवारच्या 11 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 85 झाली आहे. त्यामधील 36 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात 48 जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात 7,366 जण आरोग्य खात्याच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यातील 3,580 जणांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. एकूण 2,240 जणांनी 14 दिवसांचा तर 1,508 जणांनी 28 दिवसांचा क्‍वारंटाईन काळ पूर्ण केला असून त्यांची तब्येत ठीक आहे. आतापर्यंत 6,180 जणांच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 5,805 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 85 जणांचा पॉझिटिव्ह आला आहे. अजून 233 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या