केंद्र सरकारचा मोठा निर्णय: 18 वर्षावरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. आता 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देण्यात येणार आहे. 1 मे पासून हे लसीकरण सुरु होणार आहे. याशिवाय लस उत्पादकांना 50 टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असं देखील सांगण्यात आले आहे.

यापूर्वी 45 वर्षावरील नागरीकांना कोरोना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव बघता लसीकरणाच्या टप्प्यात वाढ करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोनावरील लसीकरणासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे. सरकारी केंद्रावर मोफत लस देण्यात येत आहे. तर खासगी रुग्णालयात एका कोरोना लसीच्या डोससाठी 250 रुपये आकारले जात आहेत. (Big decision of central government Everyone above 18 years of age will get corona vaccine)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही औषध कंपन्यासोबत देखील आज बैठक झाली आहे. भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी कोरोना रु्गणांना दिल्या जात आहेत. 'स्पुटनिक व्ही' या लसीला देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपत्कालीन मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.

कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी देशात लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर लस पुरवठ्यास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलण्यात यावीत अशी सूचना देखील केली आहे.
 

संबंधित बातम्या