रणसंग्राम विधानसभेचा २०२०: बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतयुद्ध; दहा नोव्हेंबरला मतमोजणी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

सलग सातव्यांदा सत्तासिंहासन मिळविण्याच्या तयारीत असलेल्या जेडीयूचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा सामना राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याशी असेल.

नवी दिल्ली: अवघा देश कोरोनाच्या संसर्गाला सामोरे जात असताना  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून दहा नोव्हेंबरला निकाल लागेल. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. सलग सातव्यांदा सत्तासिंहासन मिळविण्याच्या तयारीत असलेल्या जेडीयूचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा सामना राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते आणि लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याशी असेल.

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत  निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबतच बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे, पूर्वीचे मित्र आता परस्परांविरोधात दोन हात करताना दिसतील . मागील निवडणुकीत लालूप्रसाद यादव, नितीशकुमार आणि काँग्रेस हे तिघे एकत्र होते. भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. 

मतदानाच्या वेळेमध्ये वाढ
कोरोना संक्रमित रुग्णांना मतदानाच्या शेवटच्या तासांमध्ये त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान करण्याची मुभा असेल. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा वेळ एक तासाने म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत वाढविण्यात आला आहे.

उठो बिहारी, करो तैयारी
जनता का शासन अबकी बारी
बिहार में बदलाव होगा
अफ़सर राज ख़त्म होगा
अब जनता का राज होगा
- लालूप्रसाद यादव, अध्यक्ष, राजद

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या