बिहार निवडणुकीच्या तयारीवरून काँग्रेसमध्ये मतभेद

Bihar assembly election: Disagreement in Congress leaders
Bihar assembly election: Disagreement in Congress leaders

नवी दिल्ली: काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर नेतृत्व बदलावरून संघर्ष पेटला असताना बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीपासून पक्ष अद्याप कोसो दूर असल्याची भावना संघटनात्मक पातळीवर बळावू लागली आहे. काही नेत्यांनी तर तशी खंत जाहीरपणे बोलून दाखविली आहे तर निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या बड्या नेत्यांनी लवकरच समविचारी पक्षांसोबत आमची आघाडी होईल अशी आशा व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी देखील समाधानकारक राहील असे त्यांचे म्हणणे आहे. 

येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार असून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेस मात्र येथे विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याच्या तयारीत दिसत नाही. काँग्रेसने राष्ट्रीय जनता दलासोबत (आरजेडी) आघाडी केली असली तरी पक्षांतर्गत लाथाळ्या सुरू असल्याने मित्र पक्ष काँग्रेसला जागा वाटपात किती मान देतील याबाबत साशंकता आहे. 

फटका बसणार?
मध्यंतरी पक्षातील २३ बड्या नेत्यांनी संघटनात्मक बदलांची मागणी करणारे एक पत्र पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. यावरून पक्षामध्ये केंद्रीय पातळीवरच दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

काँग्रेसमधील या अंतर्गत मतभेदांचा मोठा फटका पक्षाला बिहारच्या निवडणुकीत बसू शकतो असे काहींचे म्हणणे आहे तर अन्य नेत्यांनी मात्र तशी शक्यता फेटाळून लावली आहे. 

आघाडीला तडे 
कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये ही निवडणूक होत असल्याने सर्वच पक्षांना त्यांच्या प्रचाराची रणनीती बदलावी लागणार आहे. मागील पंधरा वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले नितीशकुमार विरोधकांना कसे सामोरे जातात? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांच्या आघाडीला पहिल्यापासूनच तडे जायला सुरूवात झाली आहे, हिंदुस्थानी आवामी मोर्चाने सर्वप्रथम बंडाचे निशाण रोवले.

सध्या आम्ही योग्य दिशेने जात आहोत. योग्य गोष्टी योग्यवेळी घडतात. सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे. पक्षातील मतभेदांचा या निवडणुकीवर कसलाही परिणाम होणार नाही. आघाडी आणि जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे. - शक्तीसिंह गोहिल, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेस पक्षाची निवडणूक तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही, विरोधक आमच्यापेक्षा खूप पुढे आहेत. आघाडी झाली तरीसुद्धा आम्हाला फार जागा मिळतील असे वाटत नाही. कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष निवडणुकीनंतर परत महाआघाडीमध्ये जाऊ शकतो. - कौकाब कादरी, काँग्रेसचे नेते

आझादांची नाराजी
काँग्रेसनेही राज्यांमध्ये व्हर्च्युअल सभा घेण्याचे नियोजन आखले असले तरी अनेक नेत्यांना पक्ष अद्याप पुरेसा तयार नसल्याचे वाटते. पक्षाचे वरिष्ठ नेते कीर्ती आझाद यांनी ही बाब उघडपणे बोलून दाखविली आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्रचार करताना अनेक आव्हाने असतील एक म्हणजे सार्वजनिक सभा आता घेता येणार नाहीत. भाजप व्हर्च्युअल प्रचारामध्ये खूप पुढे आहे, त्यांच्याकडे यंत्रणा तयार असल्याने त्यांनी जून महिन्यापासून प्रचार सुरू केला होता असे आझाद यांनी नमूद केले. 

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com