बिहार विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदीचा नितीशकुमारांवर भरोसा

उज्ज्वल कुमार
रविवार, 20 सप्टेंबर 2020

पासवान यांची टीका : सत्ताधारी ‘एनडीए’त असूनही विरोधात भूमिका

पाटणा:  बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) पक्षांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रस्ते, उड्डाणपूल, इमारतींच्या भूमिपूजनावर भर दिला आहे. त्याच वेळी लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) चिराग पासवान हे बिहारमधील ‘एनडीए’चा चेहरा असलेल्या नितीश कुमार यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.

डॉ. आंबेडकर यांच्याशी तुलना
पासवान यांचा पक्ष ‘एनडीए’चाच एक भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुशासनाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढत असतानाच  बिहारमध्ये हुकूमशाही वाढत असल्याचा आरोप चिराग पासवान करीत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून चिराग नितीश कुमारांवर टीका करीत आहेत. याविरोधात त्यांचे समर्थक आता मैदानात उतरले आहेत किंवा त्यांना उभे केले आहे. 

सरकारचेच टीकाकार
पासवान हे विरोधी पक्षात असल्यासारखे सरकारवर आरोप करीत असल्याचे चित्र सध्या आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात भाजपने शांत बसणे पसंत केले आहे. बिहारच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याच सरकारचे मुख्य टीकाकार बनले आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे. पासवान यांच्या भाषणबाजीमागे जागा वाटपात लाभ मिळावा हा हेतू असल्याचा सूत्रांचा दावा आहे.

‘चिराग लहान आहेत’
महाआघाडीतून बाहेर पडत नितीशकुमार यांच्या छायेखाली आलेल्या जितनराम मांझी यांच्यावर आता चिराग पासवान यांना उत्तर देण्याची जबाबदारी सोपविली आहे. मांझी म्हणाले, की चिराग पासवान यांना काही समजत नाही. अजून ते लहान आहेत. पक्षाची धुरा सांभाळली म्हणजे कोणी मोठा होत नाही. सत्तेत भागीदार असूनही चिराग पासवान हे नितीशकुमारांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.

संबंधित बातम्या