बिहारमध्ये ३१ पर्यंत लॉकडाउन लागू राहणार

PTI
बुधवार, 15 जुलै 2020

पाटणा, भागलपूर, पुर्णिया, बक्सर, नवाडा, कैमूर, मोतिहारी, मुंगेर, खगडिया आणि किशनगंज येथे अगोदरच लॉकडाउन लागू आहे.

पाटणा

अनलॉक-२ च्या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने बिहार सरकारची काळजी वाढली आहे. त्यामुळे येत्या ३१ जुलैपर्यंत राज्यात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ११०० हून अधिक प्रकरणे सापडल्यानंतर बिहार सरकारने पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आपत्कालिन व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावण्यात आली आणि त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील दहा जिल्ह्यात पाटणा, भागलपूर, पुर्णिया, बक्सर, नवाडा, कैमूर, मोतिहारी, मुंगेर, खगडिया आणि किशनगंज येथे अगोदरच लॉकडाउन लागू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. जून महिन्यात एका दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सरासरी अडीचशे असताना जुलै महिन्यात ती संख्या दुप्पट तिप्पट झाली. आता दररोज हजार ते १२०० रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या आठवड्यात मुख्य सचिव दिपक कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात कोरोनाच्या तीव्रतेचे आकलन करुन गरज पडल्यास लॉकडाउन लागू करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार भागलपूर आणि नंतर पाटण्यात दहा जुलैपासून लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्याच दिवशी १५ जिल्ह्यात कमी प्रमाणात लॉकडाउन लागू करण्यात आला.

संबंधित बातम्या