बिहारमध्ये बसून सुशांतच्या मृत्यूबाबत 'फेक न्यूज' देणारा युट्यूबर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

याबाबत शिवसेनेच्या लीगल सेलशी संबंधित वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्याकडून आरोपीवर मानहानी, सार्वजनिकरित्या बदनामी आणि ठरवून अपमान केल्याच्या आरोपाखाली तक्रार देण्यात आली होती.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजूपतच्या मृत्यूनंतर यु्ट्यूबवर फेक न्यूज पसरवणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हा बिहारमधील युट्यूबर असून त्याच्यावर सुशांतच्या मृत्यूबाबत खोट्या बातम्या देऊन १५ लाख रूपयांची लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 

याबाबत शिवसेनेच्या लीगल सेलशी संबंधित वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्याकडून आरोपीवर मानहानी, सार्वजनिकरित्या बदनामी आणि ठरवून अपमान केल्याच्या आरोपाखाली तक्रार देण्यात आली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधिताला बिहारमधून अटक केली आहे.  
 
आरोपी व्यवसायाने अभियंता-

आरोपीचे नाव राशिद सिद्धिकी असून तो पेशाने एक सिव्हील अभियंता आहे. त्याचे युट्यूबवर 'एफएफ न्यूज' नावाने एक चॅनेल आहे. आरोपीला अटक केल्यानंतर सोडूनही देण्यात आले आहे. मात्र, पुढील तपासात सहकार्य करण्याच्या अट त्याला घालण्यात आली आहे.    
  
आदित्य ठाकरे आणि अक्षय कुमार यांच्या नावाचाही समावेश- 

सिद्धिकी याने अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या विरोधातही अनेक खोट्या बातम्या प्रसारित केल्या. त्याच्या या बातम्यांना लाखोंचा दर्शक वर्गही मिळाला.

फेक न्यूजमुळे त्याचे सबस्क्रायबर्सही वाढले- 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धिकीने अभिनेत्याच्या मृत्यूनंतर खोट्या अफवा पसरवत १५ लाख रूपयांची कमाई केली आहे. सुशांतच्या मृत्यूआधी या चॅनेलला दोन लाख सबस्क्रायबर्स होते. ज्यात वाढ होऊन आता ती संख्या ३.७० लाख एवढी झाली आहे. 

 अक्षय कुमारनेही 500 कोटींच्या मानहानीचा दावा केला-
 
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यानेही राशिद सिद्धिकीवर ५०० कोटी रूपयांच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. आरोपी सिद्धिकी याने आपल्या एका व्हिडिओत अभनेता अक्षय कुमार याने सुशांतच्या मृत्यूनंतर रियाला कॅनडामध्ये लपवून ठेवल्याचे वृत्त दिले होते.
 

संबंधित बातम्या