विजापूर बंगळूर बसला आग पाच जणांचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

हिरियूर तालुका हद्दीत बसला आग लागल्याची ही तिसरी घटना आहे.

बंगळूर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 48 वर हिरियूर तालुक्‍यातील जावनगोंडनहळ्ळी जवळील कस्तुरीरंगप्पनहळ्ळी गावात विजापूरहून बंगळूरला जाणाऱ्या बसला बुधवारी आग लागून पाच जण ठार झाले.
शीला (वय 33), स्पर्ष (8), समृद्ध (5), कविता (29) आणि निश्‍चिता (3) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पीडित विजापूर येथून बंगळूरला जात होते. पहाटे 3.45 वाजता बसला आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
हिरियूर तालुका हद्दीत बसला आग लागल्याची ही तिसरी घटना आहे. विजापूर येथून प्रवाशाना घेऊन जाणारी बस रात्री 9 वाजता निघाली. ती सकाळी साडेसहा वाजता बंगळूरला पोचणार होती. त्यामध्ये 32 प्रवासी होते. अपघातातून सुटलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, रात्री 11 वाजता काही वेळ ब्रेक घेऊन बस न थांबताच जात होती. इंजिनजवळ आग लागल्याचे दिसताच क्‍लिनरसह बसच्या चालकाने बस थांबवून उडी मारली. कोविड- 19 नंतर सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी बंगळूरला परत निघालेले बीएमटीसीचे कर्मचारी बसवराज कोडिहाळ म्हणाले की, तहान लागल्याने जीव वाचविण्यात मदत झाली. बसला आग लागलेली दिसताच मी काच फोडून बसमधून उडी मारली आणि वाचलो. मी मागील सीटवरील प्रवाशालाही बाहेर काढून वाचविले.
सहकारी प्रवाशांची किंचाळी ऐकून अनेकांनी बसमधून उडी मारली. त्यातील काही जणांना यात दुखापत झाली व त्यांच्यावर हिरियूर तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जे लोक झोपेत होते आणि बसमधून बाहेर पडू शकले नाहीत अशांचा मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक जी. राधिका यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्य हाती घेतले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या