Bird Flu: बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा परिणाम थेट मटणावर

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

राज्यातील बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा थेट परिणाम मटणाच्या किंमतीवर झाला आहे. ​झणझणीत मटण खाणऱ्या आणि तांबडा पांढरा रस्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांना आपला खिसा रिकामा करावा लागणार आहे.

मुंबई: राज्यातील बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा थेट परिणाम मटणाच्या किंमतीवर झाला आहे. अनेक ठिकाणच्या विक्रेत्यांनी मटनाच्या भावात दरवाढ केली आहे. त्यामुळे आता झणझणीत मटण खाणऱ्या आणि तांबडा पांढरा रस्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांना आपला खिसा रिकामा करावा लागणार आहे.

राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याने त्याचा थेट परिणाम मटणाच्या किंमतीवर झाल्याचं दिसून येत आहे. बर्ड फ्लू पूर्वी अनेक ठिकाणी 450 ते 500 रुपये प्रतिकिलो विकले जाणारे मटण आता 650 रुपयांच्या जवळपास विकले जात असल्याच दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला हे दर न परवडण्यासारखे आहे. दरम्यान चिकनच्या दरात मात्र घट झालेली दिसत आहे. चिकन ची विक्री 100 रूपये प्रतिकिलो  करण्यात येत आहे. मात्र त्याला हवी तशी मागणी मिळत नाही आहे.

यापूर्वी 300 रुपये किलोने विकली जाणारी गावरान कोंबडी आता 160 रुपयालाही विकणे कठीण झाले आहे. अशीच परिस्थिती बॉयलर कोंबडीबाबत झाली आहे. सध्या बॉयलर कोंबड्या 130 ते 150 रुपयाच्या दरात विकल्या जात आहेत. बर्ड फ्लू संसर्गाचा परिणाम अंडे विक्रीवरही झाला आहे. एरवी 8 रुपयाला विकले जाणारे देशी अंडे आता 3 रूपयालाही विकले जात नाही. बर्ड फ्लू संसर्गाच्या भीतीमुळे ग्रामीण भागातील कोंबड्या अत्यंत कमी भावात खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कुक्कुटपालन करणाऱ्या  कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

25 जानेवारीपासून नाशिक ते बेळगाव प्रवास करा विमानाने - 

बर्ड फ्लू मुळे चिकन दुकानापेक्षा  मटणाच्या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. बर्ड फ्लू या रोगाचा परिणाम चिकन विक्री वर झाला आहे परिणामी चिकनच्या दरात मोठी घट सुध्दा झाली आहे. मटणाची मागणी वाढल्यामुळे मटणाच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर बकऱ्यांच्या विक्री किंमतीतही वाढ झाली असल्याची माहीती मटण विक्रेत्यांनी दिली आहे. बोकडाची आवक कमी झाल्याने मटणाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साधारण 700 ते 750 रूपये या दरात मटण विकले जात आहे.

दरम्यान, शेजारच्या इतर राज्यातील बर्ड फ्लूची प्रकरणे नियंत्रणात येईपर्यंत महाराष्ट्रातून कोंबडीचा पुरवठा बंद करण्याचे आदेश तेलंगणा सरकारने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

इतर राज्यात काही भागात मटणाचे दर 1,200 रुपयांपर्यंत वाढले आहे.  विशेषत: ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) हद्दीत आता सरकारने मटण  600 ते 700 रुपये प्रतिकिलो निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मांस विकणाऱ्या दुकानदारांना या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल असेही सांगण्यात आले आहे.

तेलंगणा राज्यात अद्याप बर्ड फ्लूचे कोणतेही रुग्ण आढळले नसले तरी, लातूर, परभणी, नांदेड, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अहमदनगर, बीड आणि रायगड या महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमधून कुक्कुटपालनात बर्ड फ्लूची नोंद झाली आहे. त्यामुळे येथिल संशयित पक्षी मारले जात आहेत.

 

संबंधित बातम्या