"आपण फक्त मदत केली"; आसाम ईव्हीएम प्रकरणावर भाजप उमेदवाराचे स्पष्टीकरण

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

भाजपचे उमेदवार कृष्णेंद्रू पॉल यांच्याशी संबंधित गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने आसाम मध्ये मोठा वाद उभा राहिल्याचे दिसत आहे.

आसाम मध्ये  1 एप्रिल रोजी  विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला. त्यातच भाजपचे उमेदवार कृष्णेंद्रू पॉल यांच्याशी संबंधित गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने आसाम मध्ये मोठा वाद उभा राहिल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाची गाडी बिघडल्याने या खासगी गाडीतून ईव्हीएम घेऊन जात असल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकरणात आता कृष्णेंद्रू पॉल यांनी आता या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.(BJP candidate krishnendu paul explanation on Assam EVM case)

या प्रकरणावर आपले मत व्यक्त करताना, ड्रायव्हरने मतदान कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी लिफ्ट दिल्याचे सांगत कृष्णेंद्रू पॉल यांनी ईव्हीएम बद्दलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कृष्णेंदू पॉल यांनी यावर बोलताना सांगितले की, "आपला ड्रायव्हर कारमधून जात असताना मतदान अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे मदत मागितली आणि त्याने मदत केली. तसेच यावेळी गाडीवर एक पासही होता, ज्यामध्ये भाजपच्या उमेदवाराचे वाहन असल्याचा उल्लेख देखील केलेला होता, मतदान अधिका्यांना याची माहिती होती की नाही हे आपल्याला माहिती नाही" असे म्हणत, आम्ही फक्त मदत केली असल्याचे स्पष्टीकरण कृष्णेंद्रू पॉल यांनी दिले आहे.

गुरुवारी रात्री ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ईव्हीएम एका खासगी बोलेरो गाडीमध्ये दिसले आणि काही लोकांनी त्या गाडीला  थांबवले. संबंधित गाडी करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णेंदु पॉल यांच्याशी संबंधित असल्याचे समजते. दरम्यान, मतदान केंद्रातून स्ट्रॉंग रूम कडे ईव्हीएम (EVM) घेऊन जात असताना वाहन बंद झाल्याने ईव्हीएम दुसऱ्या खासगी वाहनातून घेऊन जात असल्याचे निवडणूक आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. 

संबंधित बातम्या