भाजपचे लक्ष ‘वंगभूमी’कडे

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सूत्रे गृहमंत्री अमित शहा हे स्वतःच्या हाती घेणार आहेत. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचा पुढील आठवड्यातील बंगाल दौरा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी स्वतः शहा त्या राज्यात जाऊन भाजपच्या निवडणूक तयारीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील.

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सूत्रे गृहमंत्री अमित शहा हे स्वतःच्या हाती घेणार आहेत. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचा पुढील आठवड्यातील बंगाल दौरा रद्द करण्यात आला असून त्याऐवजी स्वतः शहा त्या राज्यात जाऊन भाजपच्या निवडणूक तयारीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. लॉकडाउननंतर शहा बहुधा पहिल्यांदाच दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीबाहेर जात आहेत. 

बंगालमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने सारा जोर लावला आहे. त्यासाठी शहा ५ नोव्हेंबरला दोन दिवसीय दौऱ्यावर बंगालमध्ये जाणार आहेत. १ मार्चला ते याआधी बंगालला गेले होते. नड्डा हे निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठीच जाणार होते तथापि त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. शहा यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बिहार निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय भाग घेतलेला नाही. त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आल्याचे बोलले जात असले तरी त्यांच्या गाठीभेटी व बैठकांचा प्रघात पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. राज्यपाल जगदीश धनखड यांनी दिल्लीत शहा यांच्याशी नुकतीच चर्चा केली होती. राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे मत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मांडले. 

संबंधित बातम्या