भाजपा आसाममधील जनतेत धर्म आणि भाषेच्या मुद्द्यावरून फुट पाडत आहे : मनमोहन सिंग 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 26 मार्च 2021

मी गेल्या 28 वर्षांपासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. आसामच्या जनतेने दिलेल्या या प्रेम व समर्थनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणि बेरोजगारीच्या मुद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.  याशिवाय गेल्या तीन दशकांपासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनमोहन सिंग यांनी,  भाजपा आसाममधील जनतेत धर्म आणि भाषेच्या मुद्द्यावरून फुट पाडत असल्याचा आरोपही केला. देशात केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुददूचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. निवडणूकांना काहीच दिवस शिल्लक असल्याने या राज्यांमध्ये प्रचारसभांना जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी आसाममधील जनतेला सर्वसमावेशक विकासासाठी कॉंग्रेसप्रणित 'महाजोत' (महाआघाडी) च्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.

यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ शेयर करत आसाममधील जनतेला संबोधित केले आहे. ''बर्‍याच वर्षांपासून आसाम हे माझे दुसरे घर आहे. मी गेल्या 28 वर्षांपासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. आसामच्या जनतेने दिलेल्या या प्रेम व समर्थनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे,''असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, ''आसामच्या जनतेने मला पाच वर्षे देशाचे अर्थमंत्री आणि 10 वर्षे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्याची संधी दिली. मात्र आज वेळ आहे की या विधानसभा निवडणुकीत जनतेने सामंजस्याने मतदान करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले. 

''देशाचा औद्योगिक विकास खुंटला असून नरेंद्र मोदींची दाढीच वाढते आहे...  

मनमोहन सिंह पुढे म्हणाले की,''आसामच्या लोकांना बर्‍याच काळापासून बंडखोरी व अशांततेचा सामना करावा लागला. परंतु तरुण गोगोई यांच्या नेतृत्वात आसामने शांतता आणि विकासाच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र आता याठिकाणी धर्म, भाषा आणि संस्कृतीच्या आधारे समाजाला विभागले जात आहे. लोकांना त्यांचे मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे.'' असेही त्यांनी म्हटले. याचशिवाय त्यांनी भाजपाचे नाव न घेत त्यांनी भाजपवर टीका केली. "जीएसटी आणि नोटाबंदीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. रोजगारासाठी तरुण चिंतेत आहेत. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती वाढल्यामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. गरीब आणि गरीब होत आहेत. कोविडच्या संकटामुळे लोक अधिकच कठीण झालेत," अशा  शब्दात मनमोहन सिंग यांनी भाजपावर टिका केली. 

त्याचप्रमाणे आता आसाममधील जनतेने अशा सरकारला मतदान केले पाहिजे जे संविधान आणि लोकशाहीच्या तत्त्वांचे पालन करणारे असेल. जे प्रत्येक नागरिकाची काळजी घेणारे आणि आसामच्या सर्व समावेश विकास करेल.'' असे आव्हान मनमोहन सिंग यांनी यावेळी बोलताना केले. तसेच, कॉंग्रेस आसामची भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यास वचनबद्ध असेल. असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 
 

संबंधित बातम्या