नथुराम गोडसेविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या या भाजप नेत्यालाही पंतप्रधान मोदी कदाचित कधीच माफ नाही करू शकणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

15 नोव्हेंबरला अचानक ट्विटरवर नथुराम गोडसेचं नाव ट्रेंड व्हायला लागलं. याच दिवशी गोडसेला अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. याबाबत आंध्रप्रदेश प्रदेश सचिवाने एक वादग्रस्त ट्विट करत पुन्हा ट्विटरवर खळबळ उडवून दिली.

दरवर्षीच काही काळासाठी का असेना  पण समाजमाध्यमांवर एक वाद उफाळून येत असतो. कालही असेच काहीसे बघायला मिळाले. काल 15 नोव्हेंबरला अचानक ट्विटरवर नथुराम गोडसेचं नाव ट्रेंड व्हायला लागलं. याच दिवशी गोडसेला अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. याबाबत आंध्रप्रदेश प्रदेश सचिवाने एक वादग्रस्त ट्विट करत पुन्हा ट्विटरवर खळबळ उडवून दिली. यावर बराच वाद उसळला.त्यामुळे लगेचच त्याने ते ट्विट काढून टाकले.

15 नोव्हेंबरला रमेश नायडू नागोथू याच्या ट्विटर हँडलवर नथुराम गोडसेच्या फोटोसोबत एक मजकूर लिहिला होता. त्यात लिहिले होते की,  'आज नथुराम गोडसे  यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. भारताच्या भूमीत जन्म घेणारे ते एक खरे आणि महान व्यक्तिमत्व होते.' 

  ट्विट करणाऱ्याला कर्माचाऱ्याला केले बडतर्फ- 

या ट्विटमुळे लोकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केल्यामुळे तात्काळ त्यांनी ते ट्विट काढून टाकत एक नवीन ट्विट पोस्ट केले. त्यात म्हटले होते की, 'माझं ट्विटर हँडल करणाऱ्याला कर्मचाऱ्याने हे वादग्रस्त ट्विट केले असून त्याला तात्काळ कामावरून काढून टाकण्यात आले आहे.'  

कोण आहे रमेश नायडू ? 

रमेश नायडू हे आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेश सचिव आहेत. त्याआधी ते भाजपच्या युथ विंगशी संबंधित होते. त्यांच्या ट्विटर बायोनुसार ते भाजप य़ुवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. याशिवाय ते आंध्रप्रदेशमधील कुचिवरीपल्ली ग्राम पंचायतीत सरपंच होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्य़ार्थी विंगचे ते चेअरमनही राहिलेले आहेत. याशिवाय ते भाजप आणि संघाशी ते भरपूर दिवसांपासून जोडलेले होते. 

या घटनेनंतर काँग्रेसने त्यांचे पद काढून घेण्याची मागणी केली आहे. याआधी भोपालमधून भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी 2019मध्ये नथुराम गोडसेला देशभक्त म्हटले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनीही यावर आक्षेप घेत साध्वी यांना मनातून कधीही माफ करू शकणार नाही, असे म्हटले होते. 

संबंधित बातम्या