भाजपकडून ईशान्येत 'नवा खेळ, नवी पार्टनरशिप'

PTI
सोमवार, 14 डिसेंबर 2020

आसाममधील बोडोलँड प्रादेशिक परिषदेमध्ये (बीटीसी) भाजपने बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) या आपल्या सहकारी पक्षाकडे पाठ फिरवत नव्या सहकाऱ्याच्या साह्याने बहुमताचा आकडा गाठला असून सत्तेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘बीपीएफ’ने सत्ता स्थापनेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाकडे भाजपने दुर्लक्ष केले. 

कोक्राझार :  आसाममधील बोडोलँड प्रादेशिक परिषदेमध्ये (बीटीसी) भाजपने बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) या आपल्या सहकारी पक्षाकडे पाठ फिरवत नव्या सहकाऱ्याच्या साह्याने बहुमताचा आकडा गाठला असून सत्तेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘बीपीएफ’ने सत्ता स्थापनेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाकडे भाजपने दुर्लक्ष केले. ‘बीटीसी’ ही स्वायत्त जिल्हा परिषद असून त्याअंतर्गत कोक्राझार, चिरांग, बक्सा आणि उदलगुरी हे चार जिल्हे येतात. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या चारही प्रमुख गटांनी केंद्र सरकारबरोबर जानेवारीमध्ये केलेल्या करारानंतर ही निवडणुक झाली आहे. 

 

नुकत्याच झालेल्या ‘बीटीसी’च्या निवडणुकीत ‘बीपीएफ’ सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्यांना ४० पैकी १७ जागा मिळाल्या. भाजपला ९ जागांवर विजय मिळाला. युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (युपीपीएल) या पक्षाला १२, काँग्रेसला एक, तर गण सुरक्षा पार्टीला एक जागा मिळाली. राज्यातील सर्वानंद सोनोवाल सरकारमध्ये भाजप आणि ‘बीपीएफ’ हे सहकारी पक्ष असून ‘बीपीएफ’चे तीन आमदारांना मंत्रिपदेही आहेत. राज्यात एकत्र असूनही ‘बीटीसी’ची निवडणूक भाजप आणि ‘बीपीएफ’ने स्वतंत्रपणे लढविली. या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली होती. निवडणुक निकालानंतर बहुमतासाठी केवळ चार जागा कमी पडत असल्याने ‘बीपीएफ’ने भाजपला मदतीचे आवाहन केले. मात्र, निकालानंतर काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘यूपीपीएल’ या ‘मित्र’ पक्षाला १२ जागा मिळाल्याबद्दल त्यांचे ट्वीटरवरून अभिनंदन केले आणि राजकीय दिशा स्पष्ट केली. यानंतर लगेचच मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ‘यूपीपीएल’चे प्रमुख प्रमोद बोडो हे ‘बीटीसी’चे नवे मुख्य कार्यकारी सदस्य असतील, असे जाहीरही केले. सत्तेमध्ये गण सुरक्षा पार्टीही सहभागी आहे. लवकरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. 
 

 

"राष्ट्रीय लोकशाही आघाडी ईशान्येतील जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. ‘बीटीसी’च्या निवडणुकीत यश मिळविल्याबद्दल मी आमचा सहकारी पक्ष यूपीपीएलचे अभिनंदन करतो. ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी मी इच्छा व्यक्त करतो. आमच्यावर विश्‍वास ठेवल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. "
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संबंधित बातम्या