भाजप आमदाराचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत सापडला

PTI
मंगळवार, 14 जुलै 2020

पश्‍चिम बंगालमधील घटना; हत्या केल्याचा नातेवाईकाचा आरोप

कोलकता

पश्‍चिम बंगालमधील भाजपचे आमदार देवेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह आज सकाळी त्यांच्या घराजवळ लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली असून भाजपने हत्येचा आरोप केला आहे. दिनाजपूरमधील हेमताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार देवेंद्र नाथ रे यांच्या मृत्यूस तृणमूल कॉंग्रेसला जबाबदार धरले आहे. भाजप आमदाराच्या खिशात सुसाइड नोट सापडली आहे.
आमदार देवेंद्र नाथ रॉय यांच्या खिशात सुसाइड नोट सापडली असून तिघांना जबाबदार धरले आहे. त्याचा तपास केला जात आहे. स्थानिकांच्या मते, देवेंद्रनाथ यांची हत्या केली आणि नंतर त्यांना लटकवले. या घटनेबद्धल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संताप व्यक्त करत धक्कादायक प्रकार असल्याचे म्हटले आहे. ममता सरकारमध्ये गुंडाराज असून हे कायदा आणि सुव्यवस्थेचे अपयश आहे. पश्‍चिम बंगालचे राज्यपाल जगदिप धनखर यांनी ट्विटरवर म्हटले की, भाजप आमदाराच्या मृत्युमुळे हत्येच्या आरोपाबरोबरच अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. सत्य समोर येण्यासाठी आणि राजकीय हिंसा थांबवण्यावाठी या घटनेची निष्पक्षपणे चौकशी करण्याची गरज आहे. भाजपचे नेते राहुल सिन्हा यांनी यामागे टीएमसीचा हात असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
नातेवाईकांचा आरोप
देवेंद्रनाथ रे यांचा मृतदेह सोमवारी बिंदल गावात त्यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका किराणा दुकानासमोर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. नातेवाईकांच्या मते, काल रात्री एकच्या सुमारास मोटारसायकालवरून काही लोक आले आणि त्यांच्यासमवेत देवेंद्रनाथ गेले. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
देवेंद्रनाथ रे हे २०१६ रोजी सीपीआयएमचे आमदार होते, परंतु गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीनंतर ते भाजपमध्ये दाखल झाले होते. या हत्येबाबत भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत भाजप नेत्यांच्या हत्येचे सत्र थांबत नाही. देवेंद्रनाथ भाजपमध्ये आले, हा त्यांचा गुन्हा होता काय, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कन्हैयालाल अग्रवाल यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. रॉय यांच्या मृत्युचे सत्य पोलिस चौकशीतून बाहेर येईल, असे ते म्हणाले.

संपादन - अवित बगळे
 

संबंधित बातम्या