कोरोनाला रोखण्यासाठी भाजप आमदाराकडून चालतं फिरतं हवन

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 मे 2021

कर्नाटकातील भाजपच्या आमदाराने अग्निहोत्र हवन मिरवणूक काढत कोरोना महामारी रोखण्याचा दावा केला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोना संकटाशी लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी देशातील बऱ्याच राज्यांनी लॉकडाऊनसारखा (Lockdown) कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. मात्र दुसरीकडे देशात इतकं मोठं संकट असताना कर्नाटकातील भाजपच्या आमदाराने अग्निहोत्र हवन मिरवणूक काढत कोरोना महामारी रोखण्याचा दावा केला आहे. त्यांच्या हवन मिरवणूकीवर विरोधकांनी टीकेचे बाण सोडले आहेत. कर्नाटकातील भाजप नेते  आणि आमदार अभय पाटील (BJP MLA Abhay Patil) यांनी अग्निहोत्र हवन मिरवणुकीचं आयोजन केलं होतं. बेळगावमध्येही  हवन यात्रा काढली. या हवन यात्रेमुळे कोरोनाचे विषाणू पळून जातील असा दावा केला आहे. (BJP MLA walks around to stop Corona)

''कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले गेल्याचेही यावेळी दिसून आलं. या हवन यात्रेमध्ये लोकांनी मोठ्याप्रमाणात भाग घेतला होता. शेण, कापूर, कडूलिंबाची पान, गुग्गुला आणि इतर औषधी वनस्पतीही या हवनात टाकण्यात आल्या. ही हवन मिरवणूक काही ठराविक भागामध्ये काढण्यात आली. त्या हवनातील धुरामुळे कोरोनाचे विषाणू दूर होतील'' असा दावा आमदार अभय पाटील यांनी केला आहे.

पाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू!; ICMR-WHO कडून नाल्यातील पाण्याची चाचणी

''माझा आयुर्वेदावर खूप विश्वास आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं घेण्याचा मी सर्वांना सल्ला देतो. या हवनामुळे कोरोनाचे विषाणू नष्ट होण्यास मदत होईल, असं दावा भाजपचे आमदार अभय पाटील यांनी केला आहे. दक्षिण बेळगाव मतदारसंघातून आमदार अभय पाटील तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. हवन माझ्या घरासमोर करण्यात आला आहे. आणि त्यामध्ये फक्त 50 लोक होते. त्यामुळे कोरोना नियमांचं उल्लघंन झालं आहे. अग्निहोत्र हवन एक विज्ञान आहे. हिंदूसाठी हवन विज्ञानासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला ते कळणार नाही. त्यामुळे चर्चा करण्यात काही अर्थ नाही'' असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. तसेच मतदारसंघात हवनविधी 15 जूनपर्यंत सुरु राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. बेळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासामध्ये 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 747 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

संबंधित बातम्या