"ममता दिदी...कि होयेचे?? ममता बॅनर्जींच्या पायाखालची जमीन सरकली"

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज पंतप्रधान किसान योजनेच्या अंमलबजावणीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली :  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज पंतप्रधान किसान योजनेच्या अंमलबजावणीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. स्वतःच्या पायाखालची जमीन निसटत चालली आहे हे लक्षात येताच ममता या योजनेच्या अंमलबजावणीस तयार झाल्या पण आता त्यालाही खूप विलंब झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्या हस्ते आज कृषक सुरक्षा अभियानास सुरवात झाली. यावेळी जाहीर सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले. राज्यातील तृणमूलच्या सरकारला उशिरा जाग आल्यानंतर त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. केंद्रीय योजनांपासून वंचित ठेवण्यात आल्याने राज्याच्या जनतेमधील रोष वाढत असून तो आपल्या सरकारला देखील गिळंकृत करू शकतो याची जाणीव ममतांना झाल्याने त्यांनी या योजनेस हिरवा कंदील दाखविल्याचे नड्डा म्हणाले.

मूठभर तांदूळ मोहिमेला प्रारंभ

नड्डा यांनी आज वर्धमान जिल्ह्यामध्ये विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत रोड शो देखील केला. भाजपच्या मूठभर तांदूळ या मोहिमेचा देखील त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. काही उत्साही भाजप कार्यकर्त्यांनी सभेच्या व्यासपीठावरच नड्डा यांना भाज्या भेट दिल्या. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांशी संपर्क साधण्याचे नियोजन प्रदेश भाजपने आखले आहे.

"भाजपचे नेते पश्‍चिम बंगालप्रमाणे देशाच्या अन्य भागांमध्ये जातात आणि शेतकऱ्यांच्या मुद्यावरून आरडाओरड करतात. मात्र,  दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नाही."
- चंद्रिमा भट्टाचार्य, तृणमूल नेत्या

संबंधित बातम्या