भाजप नेत्यांच्या वाहनांवर पश्चिम बंगालमध्ये जोरदार दगडफेक

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यांना मारले आणि त्यांच्या गाड्यांवर दगडफेकही केल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. विजयवर्गीय यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना नड्डा यांनी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.  

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला झाला आहे. या हल्ल्यात भाजपचे महासचिव कैलास विजयवर्गीय आणि मुकूल रॉय यांच्यासह काही नेते यात थोडक्यात बचावले. विजयवर्गीय यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांच्या गाडीच्या काचा तोडलेल्या दिसत होत्या. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यांना मारले आणि त्यांच्या गाड्यांवर दगडफेकही केल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. विजयवर्गीय यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना नड्डा यांनी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.  
 
भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी म्हटले की, 'आमच्या ताफ्यात अशी एकही कार नव्हती जिच्यावर हल्ला करण्यात आला नाही. मी सुरक्षित आहे कारण मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो. पश्चिम बंगालमधील ही अराजकता आणि असहिष्णूता लवकर संपवली पाहिजे. आजच्या हल्ल्यात कैलास विजयवर्गीय आणि मुकूल रॉय यांना दुखापत झाली असून लोकशाहीसाठी ही एक गंभीर घटना आहे. 

काय आहे प्रकरण? 

दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कोलकात्यामध्ये आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर डायमंड हार्बरनजीक जोरदार दगडफेक करण्यात आली. यादरम्यान कार्यकर्त्यांवर लाठीमारही करण्यात आला. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या वाहनावरही दग़डफेक करण्यात आली. ते दक्षिण २४ परगाना येथे जात होते. प्रदर्शषकर्त्यांनी रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न यावेळी केला. डायमंड हार्बर ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे. 

तृणमूल काँग्रेसने काय प्रत्युत्तर दिले?

भाजपने याला भारतीय राजकारणाच्या इतिहासातील काळा दिवस म्हटले आहे. तृणमूलने भाजपचा हा राज्यातील अखेरचा दौरा असेल, असे म्हटले आहे. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नेत्यांची वक्तव्ये येण्यास सुरूवात झाली आहे. तृणमूलचे नेते मदन मित्रा म्हणाले, 'भाजपचा  भवानीपूर दौरा हा अखेरचा दौरा असेल कारण बंगालचे लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहेत. भाजपचे अँटी सोशल लोक काय करायचा प्रयत्न करत आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आता पुरे झाले असून तृणमूल तयार आहे. बंगालमध्ये फक्त ममता बॅनर्जी हा एकच चेहरा आहे.

 

संबंधित बातम्या