कर्नाटकात भाजपची निवडणुकीची तयारी

पीटीआय
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

संघटन सचिव कार्यरत; स्वबळावर सत्तेसाठी रणनीती

बंगळूर: भाजपने २०२३ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी रविवारी (ता. २३) मल्लेश्वरममधील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांसमवेत साखळी बैठका घेऊन चर्चा केली. पक्ष संघटना मजबूत करण्यासह निवडणुकीत पक्षाला भरीव यश मिळवून देण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली.

चामराजनगर, म्हैसूर, हासन, मंड्या, रामनगर, बंगळूर ग्रामीण, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार या थोड्याशा कमकुवत जिल्ह्यांत पक्षाला बळकटी देण्याबाबत चर्चा झाली. राज्यसभा आणि विधान परिषदेत निष्ठावंतांना प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष कधीच विसरणार नाही. पदासाठी पक्षनेत्यांवर दबाव आणला जाऊ नये. चांगल्या कार्याची पक्ष दखल घेईल. 

राज्यसभेवर निवडलेल्या अशोक गस्ती, वीरण्णा कडाडी, प्रा. शांताराम सिद्दी, प्रा. तलवार बाबण्णा यांची नावे बऱ्याच लोकांना माहिती नव्हती. परंतु, पक्ष संघटनेत त्यांनी काय केले हे नेत्यांना ठाऊक होते. त्यामुळे, कोणत्याही लॉबीशिवाय राज्यसभेचे तिकिट त्यांना मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २० लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले. याचा फायदा कामगार वर्गाला होईल. राज्य सरकारने कामगार, विणकर, वाहनचालकांसह कामगार वर्गासाठी खास पॅकेज जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांनी शासकीय योजना लोकांपर्यंत न्याव्यात. पक्षाचे उमेदवार पराभूत झालेल्या मतदारसंघांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. नवीन कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. श्री. संतोष हायकमांडच्या टास्कची माहिती राज्य पदाधिकाऱ्यांना देत आहेत. पक्ष कशा पध्दतीने मजबूत करावा यासह निवडणुकीत जिंकण्याच्या रणनीतीबद्दल सांगत आहेत. 

संबंधित बातम्या