नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच भाजप बिहार विधानसभा निवडणुका लढवणार

उज्ज्वल कुमार / गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

अध्यक्ष नड्डा यांनी नितीशकुमार हेच आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, हे स्पष्ट केले. त्यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला.

पाटणा: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने ही निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज जाहीर केले. तसेच, भाजप, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी एकत्रितपणे ही निवडणूक जिंकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

बिहार भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आज समाप्त झाली. समारोपाच्या सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना अध्यक्ष नड्डा यांनी नितीशकुमार हेच आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, हे स्पष्ट केले. त्यांनी यावेळी विरोधकांवरही निशाणा साधला. ‘विरोधकांजवळ कोणतीही दिशा नाही आणि विचारही नाही. जनतेची सेवा करण्याचीही इच्छा त्यांच्याकडे नाही. नितीशकुमार यांचा जेडीयू, पासवान यांचा लोजपा आणि भाजप हे पक्ष ज्यावेळी एकत्र येतात, त्यावेळी विजय निश्‍चित मिळतो. यावेळीही आम्ही एकत्रच लढणार आहोत आणि यात यशस्वीदेखील होऊ,’ असे नड्डा म्हणाले. सध्या जेडीयू आणि लोजपामध्ये वाक्‌युद्ध सुरु असताना नड्डा यांनी ही एकीची भाषा केली आहे. कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलावी, अशी लोजपाचे नेते खासदार चिराग पासवान हे सातत्याने करत आहेत. पूरस्थितीवरूनही चिराग यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे जेडीयूचे नेतेही चिराग यांच्यावर जाहीर शरसंधान करत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नड्डा म्हणाले की, आपल्याला जनतेपर्यंत पंतप्रधान मोदींचा संदेश आणि नितीशकुमारांनी केलेले कामही सर्वांपर्यंत न्यायचे आहे. नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली आपण पुढील निवडणूक लढणार आहोत. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या