कर्नाटकला काळ्या कपड्यांचा धसका

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

कर्नाटक सरकारने काळ्या कपड्यांचा धसका घेतला आहे. काळे कपडे परिधान करुन १  नोव्हेंबर रोजी सायकल फेरी काढण्यावर बेळगाव पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. शिवाय कोणत्याही प्रकारचे फलक प्रदर्शित करण्यावरही बंदी आणली आहे. 

बेळगाव: कर्नाटक सरकारने काळ्या कपड्यांचा धसका घेतला आहे. काळे कपडे परिधान करुन १  नोव्हेंबर रोजी सायकल फेरी काढण्यावर बेळगाव पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. शिवाय कोणत्याही प्रकारचे फलक प्रदर्शित करण्यावरही बंदी आणली आहे. 

बेळगावसह सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळला जातो. यावेळी मराठी भाषिक काळे कपडे परिधान करुन, दंडाला काळ्या फिती बांधून मूक सायकल फेरी काढतात. पण यावेळी काळे कपडे परिधान न करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक संगमेश शिवयोगी युवा कार्यकर्त्यांना पाठविलेल्या नोटीशीत हा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी पहिल्यांदाच असा लेखी आदेश बजावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

युवा समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावताना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १९९७ च्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे. जेम्स मार्टीन विरुद्ध केरळ सरकार यांच्यातील दाव्यात हा आदेश दिला होता. त्यानुसार कोणत्याही संघटनेकडून बंद, निदर्शने, धरणे किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचे नोटीसीत नमूद आहे. बंद, निदर्शने, धरणे किंवा मिरवणुकीवेळी कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही. झाल्यास संबधित संघटनेला जबाबदार धरले जाणार आहे. १ नोव्हेंबर रोजी काळा दिन साजरा केल्यास किंवा त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास संघटनेला जबाबदार धरले जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे. 

पोलिसांनी सहा अटीही घातल्या आहेत. त्यानुसार पोलीस परवानगीशिवाय मिरवणूक काढता येणार नाही. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग रोखून धरता येणार नाही. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग किंवा जिल्हा मार्गावरुन मिरवणूक काढता येणार नाही. तेथील वाहतुकीला अडथळा आणता येणार नाही. वर नमूद केल्यानुसार सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही. प्रदर्शने किंवा बंद काळात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. शहरातील कोणतेही दुकान बळजबरीने बंद करता येणार नाही. शिवाय काळे कपडे परिधान करून व हातात फलक घेऊन सायकल फेरी काढता येणार नाही.

संबंधित बातम्या