स्थलांतरित मजुरांपुढे काळवंडलेले भवितव्य

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

कोरोनामुळे शहरातील रोजगार हिरावला; गावात उपजीविकेचा प्रश्‍न

पाटणा

चांगले आयुष्य जगण्याच्या आशेने त्यांनी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली व राजस्थानचा आसरा घेतला होता. पण कोरोनाव्हायरसच्या साथीने त्यांचे स्वप्न विखुरले गेले आणि हजारो किलोमीटरची पायपीट करीत, सायकल चालवित किंवा एखाद्याच्या वाहनातून मोफत प्रवास करीत त्यांनी पुन्हा बिहारमधील घराचा रस्ता धरला. मागास राज्य अशी ओळख असलेल्या बिहारमध्ये परतताना या स्थलांतरित मजुरांपुढे अनिश्‍चित भविष्यकाळ आहे.
सूरत, मुंबई, दिल्ली, जयपूर आणि चेन्नईहून निघालेल्या हजारो उपाशी, हतबल मजुरांचे लोंढे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील सोनाथू आणि अन्य गावांत दररोज धडकत आहेत. क्लेश आणि यातनांचे ओझे ते वाहत आहेत. त्यांच्या दुःख हलके करायला, त्यांना जवळ घेण्यास कोणीही पुढे येत नाही. सरकारी शाळा आणि अन्य इमारतींमध्ये त्यांना संस्थात्मक विलगीकरणासाठी धाडले जात असून पुढील २१ दिवस तेच त्यांचे घर असणार आहे.

शेती व ‘मनरेगा’वर उपजीविका
सोनाथू हे गाव पाटण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. काही वर्षांपूर्वी हे गाव नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली होते. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दहा हजार असून आत्तापर्यंत ४०० स्थलांतरित मजूर येथे आले आहेत. ‘‘या स्थलांतरितांना उपजीविकेसाठी गावात शेती आणि ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत काम करणे एवढेच पर्याय आहेत. मजुरांची कुटुंबे रोजगार हमीची कामे मागण्यासाठी आमच्याकडे येत आहेत,’’ असे सोनाथूच्या गाव प्रमुख पूनम देवी यांनी सांगितले.

‘नरकातून स्वर्गा’पर्यंत पायी प्रवास
‘‘कोरोनाव्हायरसने लोकांना नरकातून स्वर्गापर्यंत (घर) चालण्‍यास भाग पाडले,’’ अशी प्रतिक्रिया मोती कुमार यांनी व्यक्त केली. ते मूळचे बिहारमधील धामणी गावातील असून नुकतेच चेन्नईहून परतले आहेत. कुमार आणि त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी गावी येण्यासाठी चेन्नईतून १३ मे रोजी पायी प्रवास सुरू केला होता. अकरा दिवस अथक चालत ते अखेर गावी पोचले.

आमच्या गावासाठी हा कठीण काळ आहे, पण सर्वांना सामावून घेण्याची गावाची संस्कृती आहे.
शफाल्तासिंह, धामणीतील महाविद्यालयाचे प्राचार्य, बिहार

संबंधित बातम्या