‘न्यूयॉर्क टाइम्स'च्या दर्जेदार पुस्तकांच्या यादीत तीन भारतीयांची पुस्तके

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

दखल घेण्यायोग्य असलेल्या शंभर पुस्तकांच्या यादीत तीन भारतीय लेखकांच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ही यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाचाही समावेश आहे. 

न्यूयॉर्क  : दखल घेण्यायोग्य असलेल्या शंभर पुस्तकांच्या यादीत तीन भारतीय लेखकांच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ही यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाचाही समावेश आहे. 

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या निवड समितीने जगभरातील १०० दखलयोग्य काल्पनिक, अकाल्पनिक कथा आणि कवितांच्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या मेघा मुजुमदार (अ बर्निंग), दीपा अनप्पारा (जिन पॅट्रोल ऑन द पर्पल लाइन) आणि समांथ सुब्रह्मण्यम (अ डॉमिनंट कॅरेक्टर : द रॅडिकल सायन्स अँड रेस्टलेस पॉलिटिक्स ऑफ जे. बी. एस. हॅल्डन) या भारतीय वंशाच्या लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. 

मेघा मुजुमदार यांनी आपल्या पुस्तकात सत्तेचा वापर करून दुर्बळांना कसे चिरडले जाते, याकडे लक्ष वेधले आहे. आपल्या काल्पनिक कथेत याचे वर्णन करताना त्यांनी एका शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वर्णन केले आहे. यामध्ये मूळ सूत्रधार बाजूला राहून एका निष्पाप व्यक्तीलाच कशी शिक्षा होते, असे दाखविण्यात आले आहे. 

केरळमध्ये जन्मलेल्या दीपा यांनी त्यांच्या पुस्तकात एका नऊ वर्षाच्या मुलाची कथा रंगविली आहे. आपला वर्ग मित्र अचानक गायब झाल्यावर त्याचा शोध घेण्याचा या मुलाचा प्रयत्न वर्णन करताना दीपा यांनी हरवलेल्या मुलांचे विश्‍व उलगडून दाखविले आहे, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या समितीने म्हटले आहे. हॅल्डन हे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ होते. कट्टर साम्यवादी असलेले हॅल्डन हे आइनस्टाइन इतकेच प्रसिद्ध होते. 

सुब्रह्मण्यम यांनी आपल्या पुस्तकात हॅल्डन यांच्या कार्याचा वेध घेताना विज्ञान आणि राजकारण यांच्यातील द्वंद्व दाखविले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या यादीत मूळ भारतीय वंशाचे लेखक हरी कुंझरू यांच्या ‘रेड पिल’ या पुस्तकाचाही समावेश आहे. 

अधिक वाचा : 

सिद्धेश श्रीपाद नाईक यांचा ‘कोवॅक्सिन’च्या चाचणीत सहभाग

आता गोवा होणार ‘ड्रग्ज फ्री’: पोलिस महासंचालकाचे आश्वासन

गोव्याचा आर्थिक मुसंडी मारण्याचा प्रयत्न असणार खडतर

 

संबंधित बातम्या