बॉक्सर विजेंदर सिंगचा सरकारला जोरदार 'पंच'; शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत घेतला 'खेलरत्न' पुरस्कार परत करण्याचा निर्णय

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

दिल्लीतील थंडीतही शेतकरी आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापले असून या आंदोलनाला अनेक मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला आहे.

नवी दिल्ली- दिल्लीतील थंडीतही शेतकरी आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापले असून या आंदोलनाला अनेक मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला आहे. यात ऑलिम्पिक पदक विजेता मुष्टियोद्धा विजेंदर सिंग यानेही योगदान देत सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ त्याने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.  

काल दिल्लीच्या सिंधू सीमेवर जात त्याने शेतकऱ्यांच्या या विराट आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांचा उल्लेख 'काले कानून' (काळे कायदे) असा करत त्याने केंद्र सरकारला पुरस्कार वापसीची धमकीही दिली. 

विजेंदर सिंगने घेतलेल्या पवित्र्यावर त्याला काही अर्जून पुरस्कार विजेत्यांनीही पाठिंबा दर्शविला असून महिला हॉकीपटू राजबीर कौर, पुरूष हॉकीपटू गुरमेल सिंग, कुस्तीगीर कर्तार सिंग माजी मुष्टियोद्धा जयपाल सिंग यांसह ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार विजेते हॉकीपटू अजित सिंग आदिंचा यात समावेश आहे. वेटलिफ्टर तारा सिंग, माजी प्रशिक्षक गुरूबक्ष सिंग संधू, कबड्डीपटू हरदीप सिंग यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. 

दरम्यान, विजेंदर सिंग याने मागील वर्षी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी दावेदारी दाखल केली होती. मात्र, या निवडणुकीत त्याला आपली अनामत रक्कमही वाचवता आली नव्हती.  

संबंधित बातम्या