बिहारमधील पूल नदीत कोसळला

Avit Bagle
शुक्रवार, 17 जुलै 2020

उदघाटनानंतर २९ दिवसांत दुर्घटना; चौकशीचा आदेश

पाटणा

बिहारमध्ये २९ दिवसांपूर्वी बांधलेला सत्तरघाट पुलाचा काही भाग बुधवारी (ता.१५) नदीत वाहून गेला. या घटनेची चौकशी होणार असल्याची घोषणा रस्ते बांधणी मंत्री नंदकिशोर यादव यांनी आज केली.
गेल्या चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. पाण्याचा ताण सहन न झाल्याने पुलाला जोडणारा रस्ता ढासळला. गंडक नदीवरील सत्तरघाट पूल हा छपरा, सिवान व गोपालगंज जिल्ह्यांना जोडलेला आहे. या दुर्घटनेनंतर अभियंत्यांचे एक पथक तेथे पाठविण्यात आले. सत्तरघाट पुलाला जोडणारा रस्ता नदीत वाहून गेला असून पूल सुरक्षित असल्याचे यादव यांनी सांगितले. यामुळे उत्तर बिहारमधील अनेक जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.
या पुलाचे उदघाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते १६ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले होते. त्यासाठी २६३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केवळ २९ दिवसांत पुलाची अशी अवस्था झाल्याने विरोधी पक्षांनी नितीश कुमार यांच्यावर ट्विटरवरुन टीका केली आहे.

नितीश कुमार गप्प का?
‘‘हा पूल आठ वर्षांत व २६३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आणि केवळ २९ दिवसांत पडला. याबद्दल भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह नितीश कुमार एक शब्दही काढत नाही. बिहारमध्ये सर्वत्र लूट सुरू आहे,’’ असे टीकास्त्र राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालू प्रासाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी सोडले.
 

संबंधित बातम्या