केरळमधील सात जिल्ह्यांना 'बुरेवी' चक्रीवादळाचा धोका

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

केरळच्या दक्षिण भागातील सात जिल्ह्यांना ‘बुरेवी’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर या सात जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती केरळची मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिली.

तिरुअनंतपूरम: केरळच्या दक्षिण भागातील सात जिल्ह्यांना ‘बुरेवी’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर या सात जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती केरळची मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिली. उद्या दुपारी हे चक्रीवादळ कोल्लम, तिरुअनंतपूरला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे, केरळच्या किनारी भागात सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. 

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) आठ तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयन यांना दूरध्वनी करून केंद्राकडून मदतीचा प्रस्ताव दिला. तिरुअनंतपूरम किनाऱ्याहून हे चक्रीवादळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे.  पोनमुडीमधील सर्व वृक्षारोपण कामगारांना मदत छावण्यात हलविण्यात आले आहे.

अमित शहांशी चर्चा
चेन्नई: बुरेवी हे चक्रीवादळ श्रीलंकेहून तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकले असून राज्यातील काही भाग व पुदुच्चेरीत बुधवारी (ता. २) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बुरेवी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी तमिळनाडू व केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

श्रीलंकेहून पुढे सरकलेल्या या वादळाचा वेग प्रतितास ७० ते ८० किलोमीटर होता. ते पम्बन आणि कन्याकुमारीच्या किनारपट्टीला धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्याने तमिळनाडू व केरळमधील आपत्ती निवारण पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

संबंधित बातम्या