भारतात कर्करोगाचा विळखा होणार घट्ट

पीटीआय
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

संशोधनातील अंदाज; पाच वर्षांत दोन लाख रुग्णवाढ

नवी दिल्ली भारतातील कर्करुग्णांची संख्या या वर्षी १३.९ लाख असून ती २०२५ पर्यंत १५.७ लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि बंगळूर येथील राष्ट्रीय रोग सूचना विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीडीआयआर) यांनी व्यक्त केला. यात महिला रुग्णांची संख्या तुलनेने जास्त असल्याचे म्हटले आहे.

‘आयसीएमआर’ आणि ‘एनसीडीआयआर’च्या अहवालानुसार यंदा पुरुष कर्करुग्णांची संख्या सहा लाख ७९ हजार ४२१ एवढी गृहीत धरली असून २०२५ पर्यंत ती सात लाख ६३ हजार ५७५ पर्यंत पोचेल. महिला रुग्णांचे प्रमाण या वर्षी अंदाजे सात लाख १२ लाख ७५८ असून पाच वर्षांत ते ८ लाख ६ हजार २१८ होण्याची शक्यता आहे. यात स्तनाच्या कर्करोगाची लागण झालेल्या महिलांची संख्या दोन लाख ३८ हजार ९०८ असेल तर त्यानंतर फुप्फुसाचा कर्करोग (१,११,३२८) आणि मुखाचा कर्करोग (९०,०६०) होण्याचे जास्त असेल. 

तंबाखूमुळे कर्करोग झालेल्यांची संख्या सध्या ३.७ लाख असून एकूण कर्करुग्णांमध्ये त्याचे प्रमाण २७.१ टक्का आहे. ईशान्य भारतात हे प्रमाण सर्वाधिक आहे. याखालोखाल, जठर व स्तनाच्या कर्करुग्णांची संख्या आहे, असे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. ‘राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम २०२०’ यामध्ये हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या