चीनच्या उक्ती व कृतीत फरक : राजनाथसिंह

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

‘चीनबरोबरच्या सीमावादावर शांततापूर्ण तोडगा भारत काढू इच्छितो. मात्र १९९३ व १९९६ मधील करारांचे उल्लंघन करणाऱ्या चीनची उक्ती व कृती परस्परविरोधी आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलएसी) आपल्या सीमेच्या रक्षणाबाबत व देशाच्या अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करू शकत नाही,’’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत भूमिका स्पष्ट केली. 

नवी दिल्ली: ,‘चीनबरोबरच्या सीमावादावर शांततापूर्ण तोडगा भारत काढू इच्छितो. मात्र १९९३ व १९९६ मधील करारांचे उल्लंघन करणाऱ्या चीनची उक्ती व कृती परस्परविरोधी आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलएसी) आपल्या सीमेच्या रक्षणाबाबत व देशाच्या अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करू शकत नाही,’’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत भूमिका स्पष्ट केली. 

चीनने भारतीय सैन्याला या भागात गस्त घालण्यास अडथळे आणले आहेत का, या माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या प्रश्‍नावर राजनाथसिंह यांनी, ‘‘भारतीय लष्कराला आपल्या हद्दीत गस्त घालण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही,’’ असा निर्धार व्यक्त केला.

भारत-चीन संबंध व लडाखमधील तणावग्रस्त, स्फोटक परिस्थितीबाबत राजनाथसिंह यांनी केलेल्या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अँटनी, आनंद शर्मा, वीरेंद्रकुमार वैश्‍य, प्रसन्न आचार्य, संजय राऊत आदी पक्षनेत्यांनी प्रश्‍न विचारले. चीनबरोबरच्या वादात देशाची संसद सरकारच्य मागे भक्कमपणे उभी असल्याचे बहुतांश नेत्यांनी सांगितले. त्याबरोबरच सीमेवर एप्रिलमध्ये म्हणजे गलवान संघर्षापूर्वी चिनी सैनिक जेथे होते, तेथे त्यांनी परत गेले पाहिजे यासाठी भारताने आग्रही व ठाम रहावे आणि कोणतीही तडजोड करू नये, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

चीनवर विश्‍वास ठेवावा अशी परिस्थिती नसल्याने जवान क्षणोक्षणी सीमेवर सजग आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राजनाथसिंह म्हणाले

  •     द्विपक्षीय चर्चा सुरू असतानाच चीनने सीमेवरील परिस्थिती बदलण्याचे केलेले प्रयत्न आपण हाणून पाडले. 
  •     पूर्व लडाखमध्ये आव्हानात्मक परिस्थितीला आपण तोंड देत आहोत.
  •     आमचे शूर जवान कोणत्याही आव्हानाला परतवून लावण्यास समर्थ. 
  •     चीनने पेंगाँग भागात शस्त्रास्त्रे, दारूगोळा जमविला आहे. भारतही सज्ज. 
  •     सीमेबाबतची परिस्थिती एकतर्फीपणे बदलण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील हा संदेश चीनला पोहोचवला आहे. 
  •     देशाच्या अखंडतेसाठी कटीबद्ध असल्याचे मी मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघी यांनी सांगितले आहे. 
  •     ‘एलएसी’चा सन्मान करणे व त्याचे कटाक्षाने पालन करणे हाच सीमाभागांतील शांती व सद्भावनेचा आधार आहे.

संबंधित बातम्या