सैन्य दलाची क्षमता वाढणार; अर्जुन टॅंकची पुढील अत्याधुनिक आवृत्ती सेनेत दाखल  

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये अर्जुन हा बॅटल टँक (एम -1 ए) सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्याकडे सोपवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये अर्जुन हा बॅटल टँक (एम -1 ए) सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्याकडे सोपवला. अर्जुन हा टॅंक डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील मेट्रोच्या विस्ताराचे देखील उदघाटन केले. 

अर्जुन या भारतात विकसित करण्यात आलेल्या टॅंकचे हस्तांतर सेना प्रमुख यांच्याकडे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला. पुलवामा येथे सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यात जवानांनी दाखवलेला पराक्रम पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत राहणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच हा दिवस कोणताही भारतीय विसरू शकत नसल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळेस नमूद केले. याशिवाय दोन वर्षांपूर्वी पुलवामा हल्ला झाला होता आणि त्यात शहिद झालेल्या सर्व हुतात्म्यांना देश श्रद्धांजली वाहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितले. 

"काहीही झालं तरी सीएए लागू होऊ देणार नाही"; राहुल गांधींचा घणाघात

तसेच, सुरक्षा दलांचा अभिमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले असून, आपल्या सशस्त्र सैन्याने बर्‍याच वेळा मातृभूमीचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त, भारत शांततेत विश्वास ठेवणारा देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. परंतु, भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी मागे पुढे बघणार नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यानंतर, आपल्या सशस्त्र सेनांना जगातील सर्वात आधुनिक शक्ती बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी म्हटले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील मेट्रोच्या पहिल्या फेजच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे देखील उदघाटन केले. तसेच चेन्नईतील आयआयटीच्या डिस्कव्हरी कॅम्पसची कोनशिला नरेंद्र मोदी यांनी ठेवली. हा कॅम्पस चेन्नई जवळील शय्युर या ठिकाणी होणार आहे. यासोबतच 'चेन्नई बीच आणि अट्टीपट्टू' दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. 

अर्जुन टॅंक (एम -1 ए) - 
अर्जुन टँकमध्ये 71 बदल करून मार्क 1 ए ही आवृत्ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हा एक उच्च दर्जाचा टॅंक आहे. तसेच कोणत्याही वेळी आणि सगळ्या हवामानात वेगवान आणि अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या टॅंक मध्ये आहे. लष्करासाठी 84 हजार कोटी खर्चून 118 टॅंक खरेदी करण्यात आले आहेत. सैन्यात आधीच 124 अर्जुन टँक आहेत. त्यानंतर आता आधुनिक 118 अर्जुन टॅंक (एम -1 ए) दाखल होणार आहेत.    
    

संबंधित बातम्या