हरमलच्या मुख्य रस्त्यावर गुरांचा ठिय्या

वार्ताहर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

अपघाताला निमंत्रण अनेक पंचायतींकडचे भाडेपट्टीवरील कोंडवाडे वापराविना

तेरेखोल: हरमल पंचायत क्षेत्रांत दिवसा रात्री गुरे मुख्य रस्त्यांवर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याची समस्या नित्याचीच बनली आहे.स्थानिक पंचायतीकडून या समस्येकडे डोळेझाक केली जात असल्याने हरमलवरून मांद्रे,पालये,केरी व अन्य भागांत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.अनेक पंचायतींकडे भाडेपट्टीवर घेतलेले कोंडवाडे आहेत मात्र गुरे बांधण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.तर कांही पंचायतीकडून त्याचा उपयोग केला जात नाही.

अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर बेवारस स्थितीत गुरे बसण्याची समस्या मोठ्या प्रमाणांत भेडसावत आहे.कांही पंचायतीकडे कोंडवाडे आहेत मात्र त्यांचा उपयोग केवळ सरकार दप्तरांत नोंदीपुरते दाखवले गेले आहेत.त्यांचा उपयोग गुरे बांधण्यासाठी होत नाही.केरी तेरेखोल पंचायतीकडे भाडेपट्टीवर घेतलेला कोंडवाडा आहे मात्र त्याचा उपयोग होत नाही कारण केरी तेरेखोल पंचायत क्षेत्रांत मुळांत गुरेच कमी आहेत व ज्या कांही मालकांकडे गुरे आहेत ते स्वतः त्यांची योग्य निगा राखत असल्याने मुख्य रस्त्यांवर बेवारस स्थितीत गुरे फिरकण्याचा प्रश्नच येत नसल्याचे केरी तेरेखोल पंचायतीचे सचिव अभय सावंत यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी स्पष्ट केले.पालये पंचायतीकडे कोंडवाडा नाही.परंतु आज पालये पंचायत क्षेत्रांत पूर्वीसारखी गुरे राहिली नाहीत त्यामुळे मुख्य रस्त्यांवर गुरे बसण्याची समस्या कधी भेडसावत नाही व तत्सबंधी पंचायतीकडे कधी तक्रारही आली नसल्याचे सरपंच उदय गवंडी यांनी सांगितले.हरमल पंचायतीकडे भटवाडी हरमल येथे भाडेपट्टीवर घेतलेला कोंडवाडा आहे.मात्र गुरे बांधण्यासाठी त्याचा कधी उपयोग होत नसल्याचे हरमल पंचायतीच्या मागील ग्रामसभेत कोंडवाड्याचा प्रश्न चर्चेत आला होता त्यावेळी हे स्पष्ट झाले होते.हरमल पंचायत क्षेत्रांतील हारसन पेट्रोल पंप ते पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर गुरे दिवसा रात्री ठिय्या मारून बसलेली आढळतात.त्यामुळे वाहनचालकांना ती त्रासदायक ठरत आहेत.केरी,पालये,मांद्रे,कोरगांव आदी भागांतून दुचाकी व चारचाकीने प्रवास करणारे वाहनचालक या प्रकाराविरोधांत नाराजी व्यक्त करताना दिसतात.हरमलचे ग्रामीण आरोग्य केंद्र व गोवा स्टेट को-ऑपेरेटीव्ह बँकेच्या समोरील मुख्य रस्त्यावर गुरांचा रोजचा मोठा गोतावळा बसलेला असतो.त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.मात्र स्थानिक पंचायतीकडून याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अनेकांकडून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.मांद्रे पंचायतीकडे कोंडवाडा आहे.मात्र त्याचाही उपयोग होत नाही.पंचायत क्षेत्रांतील मुख्य रस्त्यावर गुरे सहसा येत नाहीत.अंतर्गत भागांत गुरांचा वावर आहे.परंतु रस्त्यावर येणाऱ्या गुरांची त्यांचे मालक काळजी घेताना दिसतात.त्यामुळे कोंडवाड्याचा कांहीच उपयोग होत नसल्याचे उपसरपंच आंब्रोस फेर्नांडीस यांनी सांगितले.मोरजी पंचायतिकडून रस्त्यावर येणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करताना गुरे रस्त्यावर फिरकणार नाही याची चोख व्यवस्था केली आहे.त्यामुळे मोरजी पंचायत क्षेत्रांत कुठल्याच रस्त्यावर गुरांची समस्या जाणवत नसल्याचे येथील कांही जागृत नागरिकांनी बोलताना सांगितले.आगरवाडा -चोपडे पंचायतीकडे भाडेपट्टीवर घेतलेला कोंडवाडा आहे.मात्र गुरेच नसल्याने त्याचा उपयोग होत नसल्याचे सचिव रमेश मांद्रेकर यांनी सांगितले.दरम्यान पंचायत क्षेत्रांत कोंडवाडे असले तरी पाळलेली गुरे मुख्य रस्त्यावर ठाण मांडू लागली आणि त्यांच्यापासून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तरी त्यांना कोंडवाड्यांत स्थान नाही.बेवारसपणे रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांवर जर गुरांच्या मालकांकडून दावा केला गेला नाही तर त्यांना कोंडवाड्यांत बांधली जातात.परंतु अशी गुरेही कोंडवाड्यांत दिसत नाही.म्हणजेच गुरांची संख्या कमी झाली आहे. 
 

संबंधित बातम्या