सीबीएसई’ने केंद्रसंख्या वाढविली

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर काळजी घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या सीबीएसईने पाच पटींनी वाढवून ती १५ हजारांवर नेण्याचे ठरविले आहे.

नवी दिल्ली

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १२ वीच्या व ईशान्य दिल्लीतील १० वीच्या जुलैत होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या केंद्रांची संख्या ३००० वरून १५ हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्विटरद्वारे जाहीर केला. कोरोना महामारीच्या साथीमुळे मार्चमध्ये रद्द झालेल्या बोर्डाच्या उर्वरित परीक्षा १ ते १५ जुलै या काळात घेण्यात येणार आहेत. जुलैअखेर दोन्ही निकाल जाहीर करण्याचेही सीबीएसईचे प्रयत्न आहेत.
सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर काळजी घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या सीबीएसईने पाच पटींनी वाढवून ती १५ हजारांवर नेण्याचे ठरविले आहे. जितकी केंद्रे वाढणार तेवढ्या प्रमाणात वर्गखोल्याही वाढणार असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. उर्वरित परीक्षांसाठीची केंद्रे विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येच असतील व त्यासाठी नवीन अनोळखी शाळेतील केंद्रांवर जाण्याची गरज नाही, असे ‘सीबीएसई’ने याआधीच स्पष्ट केले आहे. मात्र परीक्षा केंद्रावर मास्क घालणे, सॅनीटायजरचा वापर परीक्षार्थींसाठी बंधनकारक करण्यात आला असून थर्मल चाचणीत एखाद्या विद्यार्थ्याच्या शरीराचे तापमान १०० अंशांच्या पुढे वाढलेले दिसले तर आपला पाल्य आजारी नाही याची खातरजमा त्याच्या पालकांना करून द्यावी लागेल.
सीबीएसई १२ वी बोर्डाच्या २९ विषयांची परीक्षा बाकी आहे. १० वीचे सहा पेपर फक्त ईशान्य दिल्लीच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागतील.

संबंधित बातम्या