शेतकऱ्यांच्या अटकेचा कट होता ; मुख्यमंत्री केजरीवाल यांचा गौप्यस्फोट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी दिल्लीतील मोठी ९ क्रीडा मैदाने (स्टेडियम) तुरुंगात रूपांतरित करण्यासाठी द्यावीत म्हणून केंद्र सरकारने दिल्ली सरकारवर प्रचंड दबाव आणला होता असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

नवी दिल्ली :   कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अटक करण्यासाठी दिल्लीतील मोठी ९ क्रीडा मैदाने (स्टेडियम) तुरुंगात रूपांतरित करण्यासाठी द्यावीत म्हणून केंद्र सरकारने दिल्ली सरकारवर प्रचंड दबाव आणला होता असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. दुसरीकडे शहरी नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेतला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना सत्तारूढ आम आदमी पक्षाचे सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आज सकाळीच काही मंत्र्यांसह सिंघू सीमेवर पोहोचले. मात्र शेतकऱ्यांनी त्यांना मुख्य व्यासपीठावर जाऊ दिले नाही. 

ते म्हणाले की मी येथे मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. अन्नदात्याचा सेवक म्हणून आलो आहे. आमचा पक्ष सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. उद्याच्या भारत बंदलाही दिल्ली सरकारने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. आपचे सारे कार्यकर्ते बंदमध्ये शांततेने सहभागी होतील. चिल्ला सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज म्हशीही आंदोलनस्थळी आणल्या होत्या. येथे म्हशींची मोठी गर्दी 
झाली होती. 

"योगेंद्र यादव, केजरीवाल यासारखे लोक शेतकरी केव्हापासून झाले ? दिल्ली ठप्प करण्याची भाषा बोलणारे यादव यांनीच हिंसाचार पसरविणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांना सोडविण्याची मागणी केली होती. भाजप शेतकऱ्यांबद्दल कायमच कृतज्ञ आहे."
- कपिल शर्मा, नेते भाजप

 

निहंग साधूंचा समावेश

सिंघू सीमेवर कालपासून शीख धर्मातील निहंग शीख घोडेस्वारांचे जत्थे तलवारी घेऊन सहभागी झाले आहेत. निळी वस्त्रे परिधान करणारे हे निहंग शीख अत्यंत आक्रमक असतात व शीख धर्माच्या रक्षणासाठी ते देशभर फिरतात. शेतकरी आंदोलन सुरू असेपर्यंत आम्ही आमचे देशव्यापी दौरे रद्द केले असून येथेच थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

अधिक वाचा :

शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ला लंडनमधूनही पाठिंबा

शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ला लंडनमधूनही पाठिंबा

आंदोलक शेतकऱ्यांकडून आज गल्ली ते दिल्ली बंदची हाक ; देशभर अभूतपूर्व सुरक्षा

संबंधित बातम्या