हिवाळ्यात कोरोनाचे आव्हान अधिक; रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन

हिवाळ्यात कोरोनाचे आव्हान अधिक; रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन
challange of covid will be more in winter season

नवी दिल्ली- हिवाळ्यात ताप, खोकला या आजारांची अनेकांना लागण होते. यंदा या आजारांसोबतच कोरोनाचेही आव्हान असल्याने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एआयआयएमस) तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गासोबतच हिवाळ्यातील ताप, खोकला, पडसे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला अधिक धोका आहे, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनामुळे आधीच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आहे. त्यात हिवाळ्यातील सर्दी, पडसे यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढणार असल्याने त्यासाठी आताच तयारी करणे, तसेच नागरिकांनीही रोगप्रतिकार शक्ती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने हिवाळा अधिक आव्हानात्मक असल्याचे संस्थेच्या सेंटर फॉर कम्युनिटीचे प्राध्यापक हर्षल साळवे यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी नियमित मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे, यामुळे तुमचा केवळ कोरोनापासूनच बचाव होतो असे नव्हे तर संसर्गजन्य आजारांपासूनही तुमचे संरक्षण होते, असे साळवे यांनी सांगितले. या काळात हिरव्या पालेभाज्या, फळांचे सेवन केल्यास संसर्गजन्य आजारांपासून लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, असेही त्यांनी सांगितले.  निट काळजी न घेतल्यास हिवाळा हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणेही ठरू शकतो, असा इशारा ज्येष्ठ आहारतज्ज्ञ परमित कौर यांनी दिला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी आहार व व्यायाम या बाबींकडे लक्ष देणे व संसर्ग होऊ नये यासाठी सर्व खबरदारी बाळगणे अतिशय आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

आशियात एक कोटीहून अधिक रुग्ण

लॅटिन अमेरिकेनंतर आता आशियातही कोरोना रुग्णसंख्येने एक कोटींचा टप्पा पार केल्याने चिंता वाढली आहे. जगभरात सध्या ४ कोटी २१ लाख लोक कोरोनाबाधित आहेत. म्हणजेच त्यातील एक चतुर्थांश रुग्ण केवळ आशियात आहेत. आशियात आतापर्यंत १ लाख ६३ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील एकूण मृतांपैकी हा आकडा तब्बल १४ टक्के एवढा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com