भारतातील बालमृत्यूचे प्रमाण घटले

पीटीआय
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल; तरीही जगाच्या तुलनेत स्थिती खराबच

जीनिव्हा:भारतातील बालमृत्यू दर १९९० ते २०१९ या कालावधीत लक्षणीयरीत्या घटला असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. मृत्युदर घटला असला, तरी अद्यापही पाच वर्षांखालील बालकांच्या झालेल्या मृत्युसंख्येत भारत नायजेरियासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे गेल्या तीन दशकांत केलेल्या प्रगतीचा आलेख खाली येऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला.

संयुक्त राष्ट्रांनी आज बालमृत्यूबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. जागतिक पातळीवर पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक घटले आहे. १९९० मध्ये सव्वा कोटी बालकांचा मृत्यू झाला होता, तर २०१९ मध्ये हीच संख्या ५२ लाख आहे. बालमृत्यू होण्यामागे कमी वजन, कुपोषण, जन्माच्या वेळी निर्माण झालेल्या अडचणी, न्यूमोनिया, मलेरिया आणि इतर अनेक आजार अशी कारणे असतात. या आजारांवर योग्य उपचार करणे आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्याने अनेक बालकांचा जीव वाचवला गेला आहे. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. दीर्घकालिन उपाययोजनांनंतर मिळालेले यश यामुळे धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 
‘युनिसेफ’ आणि जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण दर प्रतिहजार बालकांमागे ३४ इतके आहे. १९९० मध्ये हे प्रमाण १२६ इतके होते. १९९० ते २०१९ या काळात मृत्यू दर घटण्याचे प्रमाण दरवर्षी ४.५ टक्के इतके होते. ५ ते १४ या वयोगटातील बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वेगाने घटले आहे. भारतासह मध्य आशिया आणि दक्षिण आशियात मृत्यू दर घटण्याचा वेग अधिक आहे. मात्र, अद्यापही विकसीत देशांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक बालमृत्यू आफ्रिका खंडातील सब-सहारा भागात (५३ टक्के) आणि मध्य व दक्षिण आशिया प्रदेशात (२८ टक्के) होतात. पाच वर्षाखालील बालकांच्या एकूण संख्येत या प्रदेशांचा वाटा ५२ टक्के असला तरी या भागांमध्ये मिळून ८० टक्के बालमृत्यू होत आहेत.   

अहवालातील निष्कर्ष

  •     कोरोनामुळे बालके आणि महिलांच्या आरोग्यसेवेवर परिणाम
  •     सध्याच्या परिस्थितीत आरोग्य सेवेवरील ताणामुळे बालकांना आरोग्य सेवा नाकारणे, महिलांनी संसर्गाच्या भीतीने प्रसूतीसाठी रुग्णालयात जाणे नाकारणे हेही कोरोनाचा दुष्परिणाम समजावा
  •     सध्याची परिस्थिती पाहता, पुढील दहा वर्षांत पाच वर्षांखाली ४.८० कोटी बालकांचा मृत्यू होईल आणि यातील निम्मे नवजात असतील

संबंधित बातम्या