चीनकडून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा प्रयत्नात लडाखमध्ये तणाव

पीटीआय
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

पूर्व लडाख भागात आपण सध्या जो तणाव अनुभवत आहोत, तो चीनने जैसे थे परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केल्याचाच थेट परिणाम असल्याचे स्पष्ट आहे.

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील तणावाची परिस्थिती हा भारत-चीन सीमेबाबत असलेली ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याच्या चीनच्या एकतर्फी प्रयत्नांचा थेट परिणाम आहे, असा दावा आज भारताने केला आहे. चीनने आगळीक केली असली तरी सर्व वाद शांततेच्याच मार्गाने सोडविण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असेही भारताने स्पष्ट केले आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली. ‘पूर्व लडाख भागात आपण सध्या जो तणाव अनुभवत आहोत, तो चीनने जैसे थे परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केल्याचाच थेट परिणाम असल्याचे स्पष्ट आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनने भारताबरोबरील चर्चा गांभीर्याने करावी आणि पूर्णपणे सैन्य माघारी घ्यावी,’ असे आवाहन श्रीवास्तव यांनी आज केले. चीनने पँगाँग सरोवर परिसरात सैन्याच्या हालचाली करत घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले, त्यांचे सर्व प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावले, असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे मॉस्को येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेसाठी (एससीओ) जाणार का, असे विचारले असता श्रीवास्तव यांनी, जयशंकर यांचा दौरा निश्‍चित असल्याचे सांगितले. या ‘एससीओ’मध्ये भारत आणि चीनसह आठ सदस्य देश आहेत. 

चीनचा आरोप फेटाळला
ॲप बंदीवरून चीनने भारतावर केलेले आरोपही अनुराग श्रीवास्तव यांनी फेटाळून लावले. भारत हा थेट परकी गुंतवणूकीसाठीची सर्वांत मुक्त बाजारपेठ असून ‘चिनी कंपन्यांवर बेकायदा निर्बंध घालत राष्ट्रीय सुरक्षेचा अवमान’ केल्याचा चीनचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतात अनेक डिजीटल आणि इंटरनेट क्षेत्रातील कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. मात्र, येथे व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना स्थानिक कायद्यांचे भान राखणे आवश्‍यक आहे. बंदी घातलेले ॲप सुरक्षेला धोकादायक होते, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठीची भारत-चीन दरम्यानची ब्रिगेडियर पातळीवरील चर्चा आज पाचव्या दिवशीही झाली. चुशूलमध्ये सुरु असलेली ही बैठक नेहमीप्रमाणे लष्करी तंबूत न होता आज तंबूबाहेर खुल्या वातावरणात झाली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या