चीनच्या कुरापती सुरूच

PTI
शुक्रवार, 17 जुलै 2020

'फिंगर ४' मधून सैन्य माघारीस नकार

नवी दिल्ली

सीमेवरील पॅनगोंग त्सो येथील फिंगर ४ भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने नकार दिल्याने दोन देशांमधील निवळत असलेला तणाव पुन्हा वाढला आहे. भारतानेही सावध भूमिका घेत पूर्व लडाख सीमेवर अतिरिक्त रणगाडे तैनात केले आहेत.
भारत आणि चीन दरम्यान लष्कराच्या कमांडर पातळीवर काल (ता. १५) १४ तास चाललेल्या चर्चेत चीनने फिंगर ४ ठिकाणाहून सैन्य माघारीस नकार दिल्याचे समजते. गलवान खोरे, हॉटस्प्रिंग आणि गोग्रा भागातून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय सहमतीने झाला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी भारत आग्रही आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज (ता. १७) लडाख आणि जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेशकुमार जोशी हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन लडाखमधील घडामोडींबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.
दरम्यान, काल चीन बरोबरील लष्करी पातळीवरील चर्चेच्या चौथ्या टप्प्याचा आढावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज घेतला.

सावध भारत
सैन्य माघारीबाबत चीन कडून होणारी टाळाटाळ आणि पूर्वानुभव लक्षात घेऊन भारतीय लष्कराने पूर्व लडाख सीमेवर चीनची संभाव्य घुसखोरी रोखण्यासाठी ६० हजार जवान सज्ज ठेवले आहेत. तसेच 'भीष्म' रणगाडे, अपाचे हेलिकॉप्टर, सुखोई लढाऊ विमाने, चिनूक आणि रुद्र हेलिकॉप्टर यांचा ताफाही तैनात ठेवला आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या