अरुणाचलमध्येही चीनच्या कुरापती: वीस दिवसांत तीनवेळा गोळीबार

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

भारत आणि चीनदरम्यान ताबा रेषेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, मागील वीस दिवसांच्या काळामध्ये उभय देशांमध्ये तब्बल तीन वेळा गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नवी दिल्ली: भारत आणि चीनदरम्यान ताबा रेषेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, मागील वीस दिवसांच्या काळामध्ये उभय देशांमध्ये तब्बल तीन वेळा गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर लडाखमध्ये चीनने ही आगळीक केली आहे. दुसरीकडे अरुणाचलच्या सीमेवरदेखील चीनने सैन्याची जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्कर सावध झाले आहे.

पँगाँग सरोवराच्या परिसरामध्ये २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना हुसकावून लावताना पहिल्यांदा गोळीबाराचा प्रकार घडला. दुसरी घटना ही ७ सप्टेंबर रोजी मुखपरी शिखरांच्या परिसरामध्ये घडली, गोळीबाराचा तिसरा प्रसंग हा आठ सप्टेंबर रोजी पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील भागामध्ये घडला होता. दोन्ही बाजूंकडून बंदुकीच्या जवळपास शंभर फैरी झाडण्यात आल्या होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

देपसांगमध्ये भूजलाचा शोध
देपसांग भागामध्ये भारतीय लष्कराकडून युद्धपातळीवर भूजलाचा शोध घेतला जात आहे. दौलत बेग ओल्डी आणि देपसांग परिसरामध्ये यासाठी वेगळी शोधमोहीम राबविली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही भारतीय जवान  आणि भूजलतज्ज्ञ हे या मोहिमेवर काम करत आहेत.

देशातच शस्त्रांची निर्मिती होणार 
आत्मनिर्भर मोहिमेअंतर्गत आता देशामध्येच ‘प्रॉपल्ड एअर डिफेन्स गन मिसाईल सिस्टिम’ आणि ‘क्लोज क्वार्टर कार्बाईन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने यासाठी अन्य देशांसोबत झालेले ३ अब्ज डॉलरचे करार रद्द केले आहेत. 

लडाखमध्ये बोफोर्स
लडाखच्या सीमांवर भारताने बोफोर्स तोफा तैनात करण्याची तयारी चालविली असून त्यासाठी तोफांची सर्व्हिसिंग देखील केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानविरोधात या तोफांचा अधिक सक्षमपणे वापर करण्यात आला होता. चीनला शह देण्यासाठी आता याच तोफा वापरल्या जाणार आहेत असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या