Indian-China Border Issue : चीननं जारी केला गलवान खोऱ्यातील संघर्षाचा व्हिडिओ

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात लडाख भागातील गलवान खोऱ्यात मोठी झडप झाली होती. व त्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिकच तणावपूर्ण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात लडाख भागातील गलवान खोऱ्यात मोठी झडप झाली होती. व त्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिकच तणावपूर्ण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावेळेस भारत व चीन यांच्यातील सैन्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताच्या वीस जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. तर चीनच्या बाजूने देखील मोठी हानी झाल्याची माहिती पुढे आली होती. मात्र या घटनेला अनेक महिने लोटल्यानंतर काही दिवसांपूर्वीच चीनने भारतीय सैन्यासोबत झालेल्या झटापटीत आपले चार सैनिक मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता चीनच्या सरकारी मालकीच्या वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारत आणि चीन यांच्या सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. 

''देशात मजबूत न्यायव्यवस्था असताना असहिष्णूता निर्माण होणे शक्य नाही...

भारत आणि चीन यांच्यात मागील वर्षाच्या मे महिन्यापासून लडाख भागातील प्रत्यक्ष सीमारेषेवर वाद उफाळला होता. आणि यात जून महिन्याच्या मध्यास अजूनच ठिणगी पडली होती. जून महिन्याच्या 15 तारखेला भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मोठा संघर्ष झाला होता. व या संघर्षात भारतीय सैन्यातील कर्नल बाबू यांच्यासह वीस जवान हुतात्मा झाले होते. तर चीनची देखील जीवितहानी झाली होती. मात्र त्यावेळेस चीनने याबाबत कोणतीच माहिती जाहीर केली नव्हती. परंतु या घटनेनंतर  दोन्ही देशांनी आपापले सैन्य सीमारेषेवर आणल्यामुळे परिस्थिती अधिकच स्फोटक बनली होती.

त्यानंतर, आता दोन्ही देशातील सैन्याच्या वाटाघाटींनंतर वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यासंबंधित प्रक्रिया चालू झाली आहे. आणि याचवेळेस चीन सरकारच्या मालकीच्या वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने गलवान खोऱ्यातील संघर्षाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ग्लोबल टाइम्सने जारी केलेल्या व्हिडीओत दोन्ही देशांचे सैनिक नदीच्या मोठ्या प्रवाहात देखील एकमेकांसमोर आल्याचे दिसत आहे. व यावेळेस त्यांच्यात मोठी झडप झाल्याचे यात दिसत आहे. इतकेच नाही तर, भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात धक्काबुक्की झाल्याचे देखील या व्हिडिओत दिसत असून, काही चिनी सैनिक मोठ-मोठ्याने ओरडत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. याशिवाय दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांना अडवण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, गलवान खोऱ्यातील वादानंतर दोन्ही देशांनी सीमारेषेवरील वाद शांततेच्या मार्गानेच सोडविण्याला प्राधान्य दिले होते. आणि त्यानुसार दोन्ही देशांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या होत्या. यातील 24 जानेवारी रोजी भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये कोर कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी पार पडली होती. या चर्चेचे उद्दिष्ट पूर्व लडाखमधील संघर्षमय ठिकाणांमधून सैन्य मागे घेणे हे होते. व या चर्चेत झालेल्या सहमतीनुसार पॅंगॉन्ग त्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्याच्या भागातील दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेण्यास काही दिवसांपूर्वीच सुरवात केली होती. तर आता दोन्ही देशांच्या सैन्यातील कोर कमांडर स्तरावरील चर्चेची दहाव्या फेरीतील बैठक उद्या शनिवारी पार पडणार आहे.      

 

संबंधित बातम्या