चीनने ताबारेषेचा आदर करा: राजनाथसिंह

पीटीआय
रविवार, 6 सप्टेंबर 2020

भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी खडे बोल सुनावले.

नवी दिल्ली: भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी खडे बोल सुनावले. चीनने ताबारेषेचा आदर करावा, तसेच तेथील स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा एकतर्फी बदल करू नये, असे ठणकावतानाच त्यांनी भारत स्वतःचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता, यांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंग यांच्यात शुक्रवारी प्रथमच समोरासमोर चर्चा झाली.

राजनाथसिंह हे सध्या शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी मॉस्कोला रवाना झाले असून, येथेच त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये तब्बल दोन तास २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. सीमेवरील कुरापतींवरून भारताने चीनला पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. चीनने सीमेवरील विद्यमान स्थिती काळजीपूर्वक हाताळावी, ती आणखी बिघडेल अशी कोणतीही पावले  टाकू नयेत, असा सज्जड दम राजनाथ यांनी चिनी संरक्षणमंत्र्यांना भरला.  दरम्यान भारताने कानउघाडणी केल्यानंतर देखील चीनचा कांगावा सुरूच आहे. आम्ही एक इंचभर देखील जमीन गमावणार नाहीत, सीमेवर तणाव निर्माण होण्यासाठी भारत जबाबदार असल्याचे चीनने म्हटले आहे.

राजनाथ म्हणाले...

  •     चिनी सैनिकांचे वर्तन आक्रमक
  •     चीनने सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविली
  •     चीनकडून द्विपक्षीय कराराचे उल्लंघन
  •     भारतीय जवानांनी नेहमी संयम दाखविला
  •     सीमेवर शांततेसाठी समजूतदारपणा दाखवा
  •     वाद वाढविणाऱ्या विषयांत अडकू नका
  •     चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो

संबंधित बातम्या