संघर्षस्थळापासून चिनी सैनिक माघारी

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

देपसांगमध्ये मात्र रणगाडे तैनातच

नवी दिल्ली

लष्करी आणि राजनैतिक मार्गाने झालेल्या चर्चेनंतर चीनने गलवानमध्ये ज्या ठिकाणी भारतीय जवानांशी संघर्ष झाला, तेथून एक किलोमीटर आतपर्यंत माघार घेतली आहे. येथील लष्करी तुकड्याही चीनने कमी करायला सुरुवात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गलवानमधून माघार घेण्याची चिनी लष्कराची ही पहिलीच वेळ आहे.
दुसरीकडे गलवानच्या उत्तरभागातील देपसांग या उंचावरील पठारावर चीनने मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करताना या भागामध्ये रणगाडेदेखील आणून ठेवल्याचे उघड झाले आहे. भारताच्या बुरत्से आणि राकी नाला येथील लष्करी छावणीवर दबाव वाढविण्याचा चीनचा कट आहे. याआधी चीनने भारताची टेहळणी चौकी क्रमांक-१४ पर्यंत घुसखोरी केल्याचे उपग्रह छायाचित्रांतून उघड झाले होते. येथून जवळच असलेल्या एका ठिकाणी भारत आणि चीनच्या लष्करात संघर्ष झाला होता. भारतानेही या भागामध्ये मोठ्याप्रमाणावर फौजफाटा आणि शस्त्रे तैनात केली आहेत. सीमेवरील तणाव निवळावा म्हणून दोन्ही देशांनी लष्करी आणि राजनैतिक मार्गाने चर्चा करण्याचे ठरविले असले तरीसुद्धा चीनचे बोलणे आणि प्रत्यक्ष वर्तन यामध्ये मोठा विरोधाभास दिसत आहे.

सीमेवरील स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानात विरोधाभास दिसून येतो. सीमेवरील स्थितीमध्ये चिनी लष्करानेच बदल घडवून आणला होता. आता सीमेवरील स्थिती पूर्ववत करण्यात मोदी सरकारला यश येते की नाही याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
- पी. चिदंबरम, नेते, काँग्रेस

बोरीस जॉन्सन चिंतित
भारत- चीनदरम्यान सीमावादावरून निर्माण झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी चिंता व्यक्त केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यावर ब्रिटन बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात केलेल्या निवेदनामध्ये जॉन्सन यांनी उपरोक्त भाष्य केले. या दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून सीमावाद मिटवावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

चीन आपल्याला घाबरविण्याचा प्रयत्न करत असला तरीसुद्धा आपण भयभीत होता कामा नये, त्यांना समजणाऱ्या भाषेतच आपण उत्तर द्यायला हवे. आपली शस्त्रसंपदा ही अंडी घालण्यासाठी नाही.
- अधीररंजन चौधरी, नेते, काँग्रेस

 

संबंधित बातम्या