उद्यापासून सिनेमा हॉल, थिएटर्स व हॉटेल्स संपूर्ण क्षमतेने उघडणार; 'हे' नियम पाळावे लागणार

उद्यापासून सिनेमा हॉल, थिएटर्स व हॉटेल्स संपूर्ण क्षमतेने उघडणार; 'हे' नियम पाळावे लागणार
Copy of Gomantak Banner (72).jpg

केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारा कोरोनाच्या संबंधित जारी करण्यात आलेल्या नव्या सूचना माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार उद्यापासून सिनेमा हॉल,  थिएटर आणि हॉटेल्स आपल्या संपूर्ण क्षमतेसह उघडणार आहे. मात्र यासाठी गृह मंत्रालयाकडून एसओपी म्हणजेच स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केले आहे. त्यानुसार सिनेमा हॉल, थिएटर्स आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने उघडता येऊ शकणार आहे. परंतु सिनेमा हॉल किंवा हॉटेल्स यांच्या आतील आणि बाहेरील ठिकाणी गर्दीचा सामना करण्यासाठी, सामाजिक अंतर आणि कोविड अंतर्गत सर्व विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना गृह विभागाकडून देण्यात आल्या आहेत.  

गृह खात्याकडून जारी करण्यात आलेल्या एसओपीनुसार, सिनेमा हॉल किंवा हॉटेल्सच्या बाहेरही हॉल, वेटिंग रूम आणि अन्य ठिकाणी सर्वांना नेहमीच सहा फूट शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून फेसकव्हर शिल्ड किंवा मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. तसेच एंट्री आणि एक्झिटला स्पर्श न करता निर्जंतवणूक करण्यासाठी टच फ्री हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्याची सूचना या एसओपीत करण्यात आली आहे. त्यानंतर नागरिकांना देखील विशेष काळजी घेण्याची सूचना गृह विभागाकडून देण्यात आली आहे. जसे की सिनेमा हॉल किंवा हॉटेल्स मध्ये खोकताना किंवा शिंकताना टिशू पेपर अथवा रुमाल धरण्याचे गृह विभागाने म्हटले आहे. 

याशिवाय, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमा हॉल, हॉटेल्सच्या आत किंवा बाहेर थुंकण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि थिएटर मध्ये प्रत्येक शो नंतर सॅनिटाईझ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तिकीट आणि पेमेंटचे व्यवहार हे संपूर्ण डिजिटल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून 'काय करावे, काय करू नये' याचे पोस्टर्स सर्व ठिकाणी लावण्याची सूचना गृह विभागाने एसओपीतून दिली आहे.     

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी 27 जानेवारी रोजी कोरोनाच्या संबंधित नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्यानुसार सिनेमा हॉल, हॉटेल्स आणि स्विमिंग पूल संपूर्ण क्षमतेसह उघडण्याची परवानगी गृह विभागाने दिली होती. ही नवीन मार्गदर्शक सूचना 1 फेब्रुवारीपासून लागू होईल. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील प्रवासावरील निर्बंध देखील उठवण्यात आले आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com