बेळगावात दोन गटांत झालेल्या हाणामारीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

वैयक्‍तिक कारणावरून तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. रविवारी सायंकाळी जुन्या धारवाड रोडवरील एका मंगल कार्यालयानजीक हा प्रकार घडला.

बेळगाव :  वैयक्‍तिक कारणावरून तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. रविवारी सायंकाळी जुन्या धारवाड रोडवरील एका मंगल कार्यालयानजीक हा प्रकार घडला. एका विशिष्ट समाजाचे लोक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मात्र, एका प्रार्थनास्थळानजीक दगडफेक झाल्याची अफवा पसरवून या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला. या घटनेत एका तरुणाच्या डोक्‍याला दुखापत झाली आहे. अर्जन बेपारी (वय २२) असे त्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दुचाकीत पेट्रोल भरण्यावरुन दोघा तरुणांत पेट्रोल पंपावर वादावादी झाली होती. वादावादीनंतर त्यांनी घटनास्थळावरुन  काढता पाय घेतला. त्यानंतर ते जुन्या धारवाड रोडवर एका गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी झाले. त्या ठिकाणी दाखल झालेल्या तरुणांच्या दुसऱ्या गटाने कार्यक्रमात घुसून वरील तरुणाला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी तुफान दगडफेकही केल्याने कार्यक्रमात गोंधळ उडाला. मारहाण करणाऱ्या टोळक्‍याने घटनास्थळावरुन पलायन केले. हाणामारीत या तरुणाच्या डोक्‍याला दुखापत झाली.

वैयक्‍तिक कारणातून झालेल्या या हाणामारीला काहींनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील एका प्रार्थनास्थळावरदेखील दगडफेक केल्याची अफवा पसरविण्यात आली. शहापूरचे पोलिस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. ही हाणामारी वैयक्‍तिक कारणातून झाल्याचे स्पष्ट होताच जमावाची समजूत काढून माघारी धाडले; मात्र या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिस बंदोबस्त होता. मार्केटचे सहाय्यक पोलिस आयुक्‍त सदाशिव कट्टीमनी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

अधिक वाचा : 

पंतप्रधान मोदींचा भारतातील कार्बन फूट प्रिंटचे प्रमाण कमी करून पॅरिस कराराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस

न्यूयॉर्क टाइम्सच्या दर्जेदार पुस्तकांच्या यादीत तीन भारतीयांची पुस्तके

संबंधित बातम्या