'यास' चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पूर्वेकडील किनारपट्टीवर नौदल तयार

Cyclone yaas.jpg
Cyclone yaas.jpg

नवी दिल्ली: ‘तौक्ते’ चक्रीवादळात (Cyclone Tauktae) बचाव कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय तटरक्षक दल (Coast Guards) आणि नौदलाने (Navy) पूर्व समुद्रात येणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेऊन ‘यास’ चक्रीवादळामुळे  (Cyclone Yaas) निर्माण परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये यांच्या सज्जतेची माहिती त्यांनी घेतली. (Coast Guard and Navy ready to fight Cyclone Yaas)

गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, गृह राज्यमंत्री, कॅबिनेट सचिव, गृह विभाग, दूरसंचार, मत्स्यव्यवसाय, नागरी उड्डाण, ऊर्जा, बंदरे, यांसह विविध मंत्रालयाचे अधिकारी एनडीआरएफ यांचे महासंचालक आणि पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. नौका आणि बचाव उपकरणांसह हवाई दल आणि लष्कराची अभियंता कृती दलांची पथके सज्ज ठेवण्यात आली  आहेत. आवश्यकता भासल्यास पश्चिम किनारपट्टीवर मानवता साहाय्य आणि आपत्ती निवारण पथके असणारी सात जहाजे सज्ज झाली आहेत.

कॅबिनेट सचिवांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक घेतली असून, गृह मंत्रालय सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहे. राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित केंद्रीय संस्थांच्या संपर्कात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) पाच राज्ये, केंद्रशासित प्रदेशात नौका, दूरसंचार उपकरणे आदींनी सुसज्ज 46 तुकड्या तैनात केल्या आहेत. याव्यतिरिक्त आज तेरा तुकड्या विमानाने पोहोचत आहेत आणि दहा तुकड्या आवश्यकता भासल्यास तयार  ठेवण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड प्रभावित क्षेत्रातील परीणामांची शक्यता लक्षात घेऊन, लसीकरणाला अडथळा येऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणेला प्रतिसादासाठी रहण्यासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत.

लोकांना सुरक्षा पुरवा
पंतप्रधानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अतिधोकादायक भागातील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी राज्यांशी समन्वय साधत सहकार्याने काम करण्याचे निर्देश दिले. तसेच किनारपट्टीवरील समुद्रात जाणाऱ्या नागरीकांचे वेळीच स्थलांतर करण्याचे आदेश त्यांनी सर्व संबंधित विभागांना दिले. चक्रीवादळादरम्यान, काय करावे आणि करू नये, याविषयी सल्ला आणि सूचना बाधित जिल्ह्यातील नागरिकांना सुलभतेने आणि स्थानिक भाषेत उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, असे निर्देश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिले.

 वादळ बुधवारी धडकणार
‘यास’ चक्रीवादळ 26 मे रोजीच्या संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशाची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 155 ते 165 किमीपासून 185 किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. यामुळे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या  किनारपट्टीवरच्या  जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडी सर्व संबंधित राज्यांसाठी सूचना जारी केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com